‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारमधील नेते आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर अपयशाचं खापर फोडत आहेत. ‘टाटा एअरबस’ प्रकल्प हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातला गेल्याचा आरोप महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. शिवाय मागील तीन महिन्याच्या कालावधीत २५ हजार ३६८ कोटींच्या १० प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली, त्यामुळे राज्यात रोजगार निर्मिती होणार आहे, अशी माहितीही सामंतांनी दिली. याबाबत प्रकल्पांची एक यादीही त्यांनी जाहीर केली.
पण या यादीतील प्रकल्पावरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जारी केलेल्या यादीमध्ये ‘मे. सिनारमस पल्प अँड पेपर प्रा. लिमिटेड’ हा प्रकल्प पहिल्या क्रमांकावर आहे. ही कंपनी रायगडमध्ये आपला प्रकल्प उभारणार असून या कंपनीकडून सुमारे २० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. पण उद्योगमंत्री उदय सामंत खोटं बोलत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. हा प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारने नव्हे तर महाविकास आघाडी सरकारने आणला असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.
हेही वाचा- “ज्याच्या घरी जेवायचं त्याच्याच घरावर…” बच्चू कडूंचा रवी राणांवर पुन्हा हल्लाबोल!
माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत आपण या कंपनीसोबत २३ मे २०२२ मध्ये दावोसमध्ये सामंजस्य करार केला होता, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. उद्योगमंत्री खोटं बोलत असून महाविकास आघाडी सरकारच्या कामाचं श्रेय घेत आहेत, असंही ठाकरेंनी म्हटलं. त्यांनी एक निवेदन जारी करत हा दावा केला आहे.
हेही वाचा- ‘उडत्या बस’नंतर देशात ‘ई-हायवे’ बनवण्याची सरकारची योजना, नितीन गडकरींची भन्नाट संकल्पना
दरम्यान, आदित्य ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेऊनही उदय सामंतावर टीकास्र सोडलं. वेदान्त फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्क सारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेलेआहेत. आता ‘टाटा एअरबस’ सारखा मोठा प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेला. उद्योगमंत्र्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मिहानसोबत एअरबस प्रकल्प नागपूरला येणार आहे. पण हा प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे उद्योगमंत्र्यांनी चुकीची माहिती का दिली? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घेणार का? असे सवालही आदित्य ठाकरेंनी विचारले.