उत्तर काशीहून गुप्त काशीकडे जाणाऱ्या मार्गात ठिकठिकाणी दरड कोसळल्याने शेकडो वाहने तीन दिवसांपासून अडकून पडलेली.. मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहणारी गंगा समोर दिसत असली तरी हजारो प्रवाशांजवळ पिण्यासाठी पाणी नाही.. बहुतेकांकडील अन्नपदार्थ संपुष्टात आलेले.. हॉटेलमध्येही ठणठणाट.. शासनाकडून कोणतेही मदतकार्य पोहोचलेले नाही..
अशी स्थिती सध्या उत्तराखंडमध्ये जोरदार पावसामुळे अडकून पडलेल्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील सुमारे २०० हून अधिक भाविकांची आहे. नालुपाणी या गावाजवळ हे सर्व अडकून पडले असून त्यांनी दूरध्वनीवरून या स्थितीचे कथन केले. नाशिक, मालेगाव, धुळे व जळगाव जिल्ह्यातील सुमारे ७० भाविक चारधाम यात्रेसाठी एका खासगी पर्यटन संस्थेमार्फत आठ दिवसांपूर्वी गेले आहेत. तीन दिवसांपूर्वी या भाविकांनी उत्तर काशी येथे दर्शन घेतले. शनिवारी त्यांनी सुमारे २०० किलोमीटरवर असणाऱ्या गुप्त काशी या धार्मिक स्थळाकडे बसमार्गे प्रवास सुरू केला तोच मुळी मुसळधार पावसात. हा संपूर्ण मार्ग दऱ्याखोऱ्यांमधून जाणारा आहे. उत्तर काशीच्या पुढे अवघे ३५ किलोमीटर अंतर पार केले असताना त्यांच्या गाडीसमोर भलीमोठी दरड कोसळली. यामुळे भाविकांनी पुढे जाण्याचा धोका पत्करला नाही. रस्त्यालगतच्या एका हॉटेलमध्ये त्यांना निवासासाठी जागा तर मिळाली, पण आसरा घेण्यापलीकडे तेथे काहीही उपलब्ध नव्हते.
उत्तर काशी ते गुप्त काशीदरम्यानच्या मार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्यामुळे या संपूर्ण मार्गावर शेकडो भाविकांची वाहने अडकून पडली असून त्यात महाराष्ट्रातील काही वाहनांचा समावेश असण्याची शक्यता नाशिक येथील दत्तात्रय सोनजे व अरविंद दशपुत्रे यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली. सुमारे ७८ तासांपासून महाराष्ट्रातील अनेक भाविक या मार्गावरील नालुपाणी येथे अडकून पडले असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तरेत पावसाचे थैमान : जोरदार पावसाने उत्तर भारतात थैमान घातले असून अनेक नद्यांना पूर आला आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशाला पावसाचा जोरदार तडाखा बसला असून हरयाणात धोक्याची पातळी ओलांडून यमुना नदी वाहत आहे. पूर आणि पावसाने २२ जण मृत्युमुखी पडले असून एक हजार लोक ‘स्थानबद्ध’ झाले आहेत. उत्तराखंडमध्ये ५० जण बेपत्ता असून त्यात प्रामुख्याने भाविक यात्रेकरूंचा समावेश आहे. या पुरामुळे प्रशासनाने गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही चारधाम यात्रा स्थगित केली आहे, तर कैलास मानसरोवराची वार्षिक यात्राही खंडित केली गेली आहे. केदारनाथ येथे सोमवारी आणखी पाच मृतदेह आढळल्याने पूरबळींची संख्या १३ झाली आहे. दरडी कोसळून अनेक महत्त्वाचे रस्ते रोखले गेले असून मुख्यमंत्री वीरभद्र सिंह हे सांगला खोऱ्यात अडकले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा