‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ या प्रसिद्ध गाण्याचे शब्द कानावर पडले तरी जीभ आपोआप ओली होते. गाण्यातील सहज कानावर पडणारे शब्द बाजारात मात्र चांगलेच वधारले आहेत. आंबटगोड चव देणाऱ्या या रानमेव्याने यंदा मोठा भाव खाल्ला आहे. यंदा जांभूळ प्रतिकिलो १५० ते २०० रुपयाने बाजारात विकली जात आहेत. पावसाळ्यात सर्वाच्या आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या व सध्या दुर्मिळ होत असलेल्या जांभळाला पावसाळ्यात मोठी मागणी असल्याने अख्खे झाड विकणाऱ्या शेतकऱ्यापेक्षा व्यापारीवर्गाला चांगले दिवस आले आहेत.
ग्रामीण भागात घराशेजारी जांभळाचे झाड असणे अशुभ मानले जाते. पण यामागे अंधश्रद्धा आहे. पूर्वी नदी, ओढय़ालगत जांभळाच्या झाडांची जणू बागच असायची. परंतु आता जांभळाची झाडे अभावानेच दिसू लागली आहेत. कुठे तरी आपसूक आलेल्या जांभळाच्या झाडाला फळ लागले, की ते कमी किमतीला व्यापारी घेतात. एका झाडापासून भरपूर जांभूळ निघतील, असा अंदाज आला की शेतकरी ३ ते ५ हजार रुपयांना ते विकतात. व्यापारी जांभूळ फळ काढून बाजारात आणतात. शेतकऱ्यांचा अंदाज तेथेच चुकतो. बाजारात जांभळाला असलेल्या भावाची माहिती करून न घेताच अत्यंत कमी किमतीला जांभळाचे फळ शेतकऱ्यांच्या हातून विकले जाते. तीन ते पाच हजारांच्या बदल्यात व्यापारी वर्ग २० ते २५ हजार रुपये कमावतो.
उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूरच्या बाजारात जांभळाला सध्या २०० रुपये प्रतिकिलो भाव आहे. कधी नव्हे तो इतका चांगला भाव मिळत असल्याने आता रस्त्याकडेला छोटे व्यापारी टोपल्यात जांभूळ घेऊन विकण्यास बसतात. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. रस्त्यावरून ये-जा करणारे विद्यार्थी, महिला-पुरुषांचे लक्ष जांभळावर पडताच ते खरेदी करण्याचा मोह ते आवरू शकत नाहीत.
बहुपयोगी फळ
मधुमेहावर जांभूळ गुणकारी आहे. जांभूळरस, तसेच बियाण्याच्या भुकटीत औषधी गुणधर्म आहे. बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहऱ्यावरील मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ हे पाचक आहे. असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, क्व्ॉश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभळात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास आवश्यक ते पोटॅशियम याचे सेवनाने मिळते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा