वाडा : खरिप हंगामात पावसाने भातपिकाचे नुकसान झालेल्या  वाडा तालुक्यातील सुमारे २० हजार शेतकऱ्या अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. भरपाई मिळणार की नाही? या विवंचनेत सध्या शेतकरी आहेत.

या वर्षीच्या खरिप हंगामात हातीतोंडी आलेल्या भात पिकाचे परतीच्या पावसाने मोठय़ा प्रमाणावर नुकसान केले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे होऊन मदतही जाहीर झाली. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करुन शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार होती. मात्र नुकसान भरपाईची रक्कम गेले दोन महिने झाले तरी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा झालेली नाही.

वाडा तालुक्यातील १९ हजार ४७१ शेतकऱ्यांचे १० हजार १५६ हेक्टर क्षेत्रावरील भातपीकाचे परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे.  आपद्ग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन कोटी ९९ लाख रुपयांचे अनुदान वाडा तहसिल कार्यालयात जमाही झाले आहे.      वाडा तहसिलदार कार्यालयाकडून हे अनुदान भारतीय स्टेट बँकेच्या वाडा शाखेत जमा केल्याचे  वाडा तहसीलदार उद्धव कदम यांनी सांगितले. मात्र, येथील बहुतांशी शेतकऱ्यांचे बॅंक खाते हे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आहेत. या बॅंकेत अजुनपर्यंत शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नाही, असे जिल्हा बॅंकेकडून सांगितले जात आहे.   याबाबच   भारतीय स्टेट बँक वाडा शाखेच्या प्रशासन विभागाशी वारंवार संपर्क साधुनही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, बिलघर येथील  प्रल्हाद शिंदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी   नुकसान भरपाई मिळण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईचे स्पष्ट कारण सांगितले जात नसल्याचे म्हटले आहे.