२०२४ साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व पक्ष लागले आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस आणि पवार यांचं सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याचा सत्ताधारी पक्षाकडून दावा करण्यात येतो आहे. अशातच प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. २०२४ साली १० ते ११ आमदार निवडून येतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
बच्चू कडू म्हणाले, “साताऱ्यातील माण-खटावमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. उमेदवाराचं नाव अद्याप ठरलं नाही. २०२४ साली प्रहारचे १० ते ११ आमदार निवडून येतील. आम्ही बसलो, तर सरकार बसेल. आम्ही उठलो, तर सरकार उठून जाईल.”
हेही वाचा : “तपास यंत्रणांना ‘त्या’ कारवायांची किंमत मोजावी लागेल”; संजय राऊतांचा इशारा, म्हणाले…
घटकपक्षांना दाबवण्याचं काम होत आहे का? या प्रश्नावर बच्चू कडू यांनी म्हटलं, “घटकपक्षांना दाबण्याचं कारण संख्याबळ आहे. लोकशाहीत संख्येचं गणित असते. एकही किंवा दोन आमदार नसणाऱ्यांनी मला दाबण्याचं काम केलं जातंय, असं म्हणण्यात अर्थ नाही. संख्या महत्वाची असते. ज्यांची संख्या अधिक, त्याचं राज्य असतं.”
हेही वाचा : “काय खोटारडा माणूस आहे”, फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया
अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, “अजित पवार पाचवेळा उपमुख्यमंत्री झाले आहेत. पण, अद्यापही त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. त्यामुळे अपेक्षा ठेवणं वाईट नाही. मी राज्यमंत्री झाल्यावर कॅबिनेटमंत्री झालं पाहिजे, असं मला वाटत होतं.”