कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात समुद्राला २१ दिवस मोठे उधाण येणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील भागात साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे, तर १२ ऑगस्टला या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती कोकणवासीयांना अनुभवता येणार आहे.
पावसाळ्यात समुद्राला मोठे उधाण येत असते. याचा फटका किनारपट्टीवरील भागात पाहायला मिळतो. समुद्र किनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटांमुळे किनारपट्टीवरील भागात समुद्राचे पाणी शिरते. यामुळे शेती नापीक होते, तर आसपासचा परिसरही जलमय होत असतो. अशातच मोठा पाऊस झाला तर २६ जुल २००५ सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पावसाळ्यापूर्वी समुद्राला येणाऱ्या भरती-ओहोटीचा अभ्यास करते आणि संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला जातो.
रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला २१ दिवस मोठे उधाण येणार आहे. यातील ११ दिवस किनारपट्टीवरील गावांसाठी धोक्याचे असणार आहेत, कारण या दिवशी ४.८० मीटर उंचीच्या समुद्री उधाणाच्या लाटा किनारपट्टीवरील भागात धडकणार आहेत, तर १२ ऑगस्टला येणारी भरती ही या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती असणार आहे. या दिवशी ४.९७ मीटर म्हणजेच जवळपास पाच मीटर उंचीचे उधाण समुद्राला येणार आहे.
रायगड जिल्ह्य़ातील समुद्र, खाडी व नद्यांच्या किनाऱ्यांवर वसलेल्या ३८५ गावांना पावसाळ्यात पुराचा धोका असू शकणार आहे. याशिवाय आंबा, रामराज, पाताळगंगा, भोगावती, मांडला, कासाड, गाढी, लेंडी, वाजापूर, ओढा, उसर्ली, किक्री, डोगराचा ओहोळ, धवरी, उल्हास, पेज, काळ, गोद, मेढा, पिटसई, तळेगाव, पढवण, कुडलिका, वलकी, बाळगंगा, सावित्री, गांधारी, नागेश्वरी, भावे, ओढा, जानसई, काल्रे, दांडगुरी या नद्यांच्या किनाऱ्यावर २६२ गावांना या उधाणाचा संभाव्य फटका बसण्याची शक्यता असणार आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्य़ात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वयित केली जाणार आहे.
अलिबाग तालुक्यात १६, मुरुड तालुक्यात ९, पनवेल तालुक्यात ५, उरण तालुक्यात ४, श्रीवर्धन तालुक्यात १९ अशी एकूण ५३ गावे समुद्रालगत आहेत. अलिबाग तालुक्यातील ११, मुरुड तालुक्यातील ८, पेण तालुक्यात ९, पनवेल तालुक्यात ११, उरणमध्ये ५, माणगावमध्ये २, महाडमध्ये ६, श्रीवर्धनमध्ये ११, म्हसळा तालुक्यात ९ अशी ७० गावे खाडीच्या लगत आहेत. समुद्राला मोठी भरती असेल आणि त्याच दिवशी अतिवृष्टी झाली तर या गावांमध्ये पुराचे पाणी शिरण्याचा धोका आहे.
जून महिन्यात ६, जुलमध्ये ६, ऑगस्ट महिन्यात ५ व सप्टेंबर महिन्यात ४ दिवस समुद्राला ४.५० मीटर्सपेक्षा जास्त उंच लाटा असलेली भरती येणार आहे. १२ ऑगस्ट रोजी सर्वात मोठी भरती येणार आहे. या दिवशी ४.९७ मीटर उंच लाटांची भरती असेल. १४ व १५ जुल या दोन दिवसांमध्ये ४.९५ मीटर उंच लाटांची भरती असेल, तर १३ ऑगस्ट रोजी ४.९२ मीटर उंच लाटांची भरती समुद्राला येणार आहे. समुद्राला भरती असेल आणि त्याच वेळी अतिवृष्टी झाली तर खाडी व नदी किनाऱ्यावरील गावांमध्ये उधाणाचे पाणी शिरून पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाडीलगतच्या गावांना संभाव्य धोका लक्षात घेऊन गावनिहाय आपत्ती निवारण आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

    ४.५० मीटर्सपेक्षा जास्त उंचीच्या भरतीचे दिवस
    जून २०१४ –         १३   ते   १८ जून
    जुल २०१४ –        १२  ते   १७ जुल
    ऑगस्ट २०१४ –   १०  ते   १४ ऑगस्ट
    सप्टेंबर २०१४ –   ९   ते   १३ सप्टेंबर

Story img Loader