सांगली : ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीला धडक बसल्याने म्हैसाळजवळ कर्नाटक परिवहन विभागाची एसटी बस ३० फूट खड्ड्यात कोसळून झालेल्या अपघातात चालकासह २१ जण जखमी झाले. बुधवारी सकाळी झालेल्या या अपघातातील जखमींना उपचारासाठी मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृर्ती स्थिर असल्याचे रूग्णालयातून सांगण्यात आले.याबाबत घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी, कर्नाटक परिवहन विभागाची बस (केए २३ एफ १००५) ही मिरजेहून कागवाडकडे निघाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हैसाळ गावाबाहेर बस आल्यानंतर विरोधी दिशेने कागवाडहून उस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एमएच १० डीएन ९५५७) हा येत होता. बस चालकांने ट्रॅक्टरला होणारी धडक चुकवण्याच्या प्रयत्नात मागील ट्रॉलीला धडक बसली. यामुळे बसवरील चालकाचा ताबा सुटला. यामुळे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या ३० फूट खड्ड्यात बस पलटी झाली. हा अपघात सकाळी साडेदहा वाजणेच्या सुमारास झाला. गावाजवळच अपघात झाल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना बसबाहेर काढले. बसमधून ४५ प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातात २० प्रवासी आणि बस चालक हे जखमी झाले असून जखमींना तात्काळ उपचारासाठी मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात हलविण्यात आले.

जखमीमध्ये १० पुरूष, ९ महिला आणि एका चार वर्षे वयाच्या मुलाचा समावेश असून सर्वाना दुखापती झाल्या आहेत. तर चालकाचा अपघातानंतर पाय अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी बराचवेळ प्रयत्न करावे लागले. अपघातात चालकाचा पाय मोडला आहे. जखमी प्रवाशांना गंभीर इजा झालेली नसली तरी २४ तास तज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.

या अपघातानंतर मिरज-कागवाड या आंतरराज्य महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलीस व मिरज ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलीसांनी वाहतूक नियंत्रण करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.