दुष्काळी मिरजगाव व परिसरातील २१ गावांसाठी भोसा खिंडीतून कुकडीचे आवर्तन सीना धरणात सोडावे व तुकाई चारीचा तातडीने पाहणी करून काम सुरू करावे यासाठी शेकडो शेतक-यांनी मंगळवारी दुपारी मिरजगावहून थेट नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणा देत मोर्चा काढला. संबंधित अधिका-यांकडून माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिका-यांनी आंदोलकांना दिले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, गुलाबराव तनपुरे, भाजपचे नामदेव राऊत आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले व जिल्हाधिका-यांना मागण्यांचे निवेदन दिले. मिरजगाव परिसरातील शेकडो शेतकरी मोटारसायकलवरून नगरला आले व शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
सरकारने कुकडीचे पाणी सीना धरणात आणण्यासाठी सन २००१ मध्ये भोसा खिंडीचे काम सुरू केले, मात्र ते १३ वर्षांनंतरही अपूर्णच आहे, कुकडी प्रकल्प पूर्ण करत असताना डाव्या कालव्यातून दीड दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. परंतु काम पूर्ण होऊनही हक्काचे पाणी मिळालेच नाही, त्यामुळे परिसर कायमचा दुष्काळी राहिला आहे. ११८ कोटी रुपयांची योजना केवळ ओव्हरफ्लोसाठी कशी केली, असा प्रश्न जिल्हाधिका-यांना करण्यात आला.
कायमस्वरूपी टंचाईग्रस्त परिसराला तुकाई चारीतून पाणी मिळावे, ही अनेक वर्षांची मागणी आहे, जुलै २०१३ रोजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याकडे झालेल्या बैठकीत कुकडी प्रकल्प मंडळाला (पुणे) चारीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यानुसार सप्टेंबर २०१३ मध्ये अहवाल प्राप्त झाला, हे काम तातडीने सुरू करावे, दुष्काळासाठी सरकार कोटय़वधी रुपये खर्च करते, मात्र ही योजना व सीना धरणात पाणी सोडल्यास सरकारचा मोठा खर्च कायमस्वरूपी वाचेल, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
विजय पवार, संतोष जंजिरे, संपतराव बावठकर, अंकुश मैत्रे, दादासाहेब शेळके, उत्तम बनकर, भाऊसाहेब शिंदे, नितीन मैत्रे, विनायक चव्हाण, कुनील त्र्यंबके आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा