राज्यातून साडेतीन ते चार हजार कंटेनर द्राक्षांची निर्यात होणे अपेक्षित होते, मात्र नव्याने लातूर, उस्मानाबाद व सोलापूर या तीन जिल्हय़ांना गारपिटीचा मोठा फटका बसल्याने जवळपास ४०० कंटेनर द्राक्षांची निर्यात यंदा होणार नाही. नेदरलँड्स, ब्रिटन, जर्मनी, बेल्जियम या देशांत द्राक्षांची निर्यात मोठय़ा प्रमाणात होते. लातूर व उस्मानाबाद जिल्हय़ांतून किमान २१४ कंटेनर द्राक्ष निर्यात होतील, असे अपेक्षित होते. २४०० मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली असती. ती न झाल्याने नव्याने विकसित होणाऱ्या द्राक्ष निर्यात पट्टय़ाला फटका बसला.
नाशिक जिल्हय़ातून द्राक्ष निर्यात मोठय़ा प्रमाणात होते. मात्र, मराठवाडय़ातील लातूर व उस्मानाबाद या जिल्हय़ांत नव्याने द्राक्षबागांचे प्रमाण वाढले. एकटय़ा लातूरमध्ये २०० कंटेनरची निर्यात होईल, अशी अपेक्षा होती. द्राक्ष निर्यात करताना घडातील मण्यांचा आकार सारखा असावा लागतो व त्यातील साखरेचे प्रमाण १७ ते १८ एवढेच असावे लागते. कोणतीही कीड नसलेली आणि बुरशी नसलेली द्राक्षे निर्यात केली जातात. सुमारे ९० ते ९२ हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षांची लागवड आहे. पैकी १४ ते १५ हजार हेक्टर क्षेत्राला गारपिटीचा फटका बसला. लातूर, उस्मानाबाद व सोलापूर या तीनही जिल्हय़ांतून गृहीत धरलेली निर्यात होण्याची शक्यता नाहीच. मात्र, सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्६य़ात झाले. पंचनामे झाल्याशिवाय ते समजू शकणार नाही. एकूणच फळबागांचे नुकसान मोठे असल्याचे सांगितले जाते. औरंगाबाद जिल्हय़ात मोसंबी, डाळिंबाचे क्षेत्र मोठे आहे. जालन्यात मोसंबी आहे. मराठवाडय़ात ४१ हजार ७८० हेक्टरावरील फळपिकांचे नुकसान झाले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Mar 2014 रोजी प्रकाशित
गारपिटीमुळे २१४ द्राक्ष कंटेनरची निर्यात गोठली
राज्यातून साडेतीन ते चार हजार कंटेनर द्राक्षांची निर्यात होणे अपेक्षित होते, मात्र नव्याने लातूर, उस्मानाबाद व सोलापूर या तीन जिल्हय़ांना गारपिटीचा मोठा फटका बसल्याने जवळपास ४०० कंटेनर द्राक्षांची निर्यात यंदा होणार नाही.

First published on: 17-03-2014 at 01:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 214 containers grapes export down to hailstorm