चुकीचे इंजेक्शन देऊन रुग्णाचे पाय गमावण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल राशीन (तालुका कर्जत) येथील डॉ. पंकज जाधव यांना राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष एस. ए. शिंबोले यांनी तब्बल २२ लाख रुपयांचा दंड ठोठावला. नगरच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचा निकाल कायम ठेवताना त्यांनी डॉ. जाधव यांची याचिका फेटाळून लावली.
याबाबतची माहिती अशी, की तात्या गवारे (रा. कोकणगाव, ता. कर्जत) यांना थंडीताप आला होता. दि. २२ जून १९९९ला ते राशीन येथील डॉ. जाधव (मातोश्री क्लिनिक) येथे उपचारासाठी गेले असता, जाधव यांनी त्यांना कमरेला सल्पाचे इंजेक्शन दिले. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्यांना तेथे गाठ आली. पुढे त्यांना बारामती येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथेही उपचार न झाल्याने त्यांना पुण्यात केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तोपर्यंत गवारे यांना गँगरीन झाल्याने त्यांचा हा पाय खुब्यापासूनच तोडावा लागला.
डॉ. जाधव यांच्या चुकीच्या इंजेक्शनमुळेच गवारे यांचा पाय तोडावा लागला, अशी तक्रार त्यांनी अॅड. नदीम सय्यद यांच्यामार्फत नगरच्या जिल्हा ग्राहक मंचात दाखल केली होती. जाधव हे अॅलोपथीचे ज्ञान नसल्याने चुकीच्या इंजेक्शनमुळे त्यांना पाय गमवावा लागला, हा सय्यद यांचा युक्तिवाद जिल्हा मंचाने मान्य करून डॉ. जाधव यांना १० लाख रुपये दंड व त्यावर तोपर्यंतचे व्याज ठोठावले होते. त्याला जाधव यांनी राज्य आयोगाकडे आव्हान दिले होते. त्यांची याचिका फेटाळून लावतान राज्य आयोगाने त्यांचा निष्काळजीपणा मान्य करून गवारे यांचा पाय गमावण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल जाधव यांनी गवारे यांना मूळ रक्कम व व्याजासह २२ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा