रत्नागिरी : कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळा बंद करून त्यातील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत सामावून घेण्याच्या शासकीय निर्णयानुसार गेल्या ६ वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील २२५ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या कारवाईचा सर्वाधिक फटका संगमेश्वर आणि खेड तालुक्याला बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत २० पेक्षा कमी पटाच्या शाळांमधील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून या शाळांमधील विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये सामावून घेण्याच्या निर्णयाची शासनाने अंमलबजावणी सुरू केली. १ ते १० आणि ११ ते २० पटसंख्या असलेल्या सर्व शाळांची संख्या आणि त्यात शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलांच्या अध्यापनाचा दर्जा व शैक्षणिक गुणवत्तेची स्थिती फारशी समाधानकारक नसते. विद्यार्थ्यांची प्रगती होत नाही अशी कारणे पुढे आली होती. त्यामुळे २० च्या आतील पटसंख्येच्या शाळांतील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत पाठवण्याच्या सूचना केल्या गेल्या. रत्नागिरी जिल्ह्यात २०१६-१७ या आर्थिक वर्षांपासून अंमलबजावणी सुरू झाली. पहिल्या वर्षी २२ शाळा बंद करण्यात आल्या. २०१६-१७ ला १०९ शाळा, २०१८-१९ मध्ये २ शाळा, २०१९-२० मध्ये २६ शाळा, २०२०-२१ मध्ये ३५ शाळा, २०२१-२२ मध्ये २२ शाळा बंद केल्या गेल्या आहेत.

शासनाकडून दरवर्षी शाळा समायोजनासंदर्भात आढावा घेण्यात येतो. यातील काही शाळांमध्ये एकही विद्यार्थी उरलेला नाही. गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. तरीही पट दिवसेंदिवस घसरत आहे. त्यामुळे कमी पटाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळून पर्यायी सुविधा करण्यात येत आहे. दुसऱ्या शाळेत विद्यार्थ्यांला पाठवताना त्यांचा वाहनखर्चही प्रशासनाकडून दिला जात आहे. सध्या जिल्ह्यात २० पेक्षा कमी पट असलेल्या सुमारे ४५० शाळा आहेत. शासनाच्या निकषानुसार तेथील ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर त्याही बंद केल्या जाणार आहेत.

कमी पटाअभावी बंद केलेल्या शाळा

तालुका         बंद झालेल्या शाळा

मंडणगड              १४

दापोली                १२

खेड                  ४४

चिपळूण               ३३

गुहागर                ८

संगमेश्वर              ४६

रत्नागिरी              १९

लांजा                 १५

राजापूर               २५