राज्यातील करोना संसर्ग अद्याप पूर्णपणे ओसरलेला नसताना, आता हळूहळू ‘ओमायक्रॉन’बाधितांची संख्येतही भर पडताना दिसत आहे. आज राज्यात २३ ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. तसेच, दिवसभरात १ हजार १७९ नवीन करोनाबाधितांची देखील नोंद झाली आहे.
तर, ओमायक्रॉनची वाढती रुग्ण संख्या आणि करोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांमध्ये कमी होत असताना आता ती देखील पुन्हा एकदा वाढू लागल्याने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री १० वाजता टास्क फोर्स सोबत बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात आजपर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉनबाधितांची एकूण संख्या ८८ झाली आहे. तर, मागील २४ तासात राज्यात ६१५ रूग्ण करोनामुक्त झाले असून, १७ कोरनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.
आजपर्यंत राज्यात ६५,००,३७५ जण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.७ टक्के आहे. तर, मृत्यू दर २.१२ टक्के आहे.
आजपर्यंत राज्यात प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ६,८१,१७,३१९ नमुन्यांपैकी आजपर्यंत ६६,५३,३४५ नमूने करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सद्यस्थितीस राज्यात ७६,३७३ जण गृह विलगिकरणात तर ८९९ जण संस्थात्मक विलगिकरणात आहेत.