GST Collection in Maharashtra: ऑक्टोबर महिन्यातील ‘वस्तू आणि सेवा कर’ अर्थात जीएसटी संकलनाची आकडेवारी समोर आली आहे. देशभरातून ऑक्टोबरमध्ये सुमारे दीड लाख कोटीहून अधिक जीएसटी संकलन झालं आहे. ऑक्टोबरमध्ये देशात सुमारे १ लाख ५१ हजार ७१८ कोटी रुपयांचं जीएसटी संकलन झाले आहे. जीएसटी संकलनाचा हा आकडा आतापर्यंतचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आकडा आहे.
यापूर्वी, एप्रिल २०२२ मध्ये सर्वाधिक जीएसटी संकलन झालं होतं. ऑक्टोबरमध्ये देशातील वस्तू आणि सेवा कर संकलन (GST) १६.६ टक्क्यांनी वाढलं असून १.५१ लाख कोटी रुपये कर जमा झाला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलन १.३० लाख कोटी इतकं झालं होतं. तर यावर्षी एप्रिलमध्ये सर्वाधिक १.६८ लाख कोटी रुपयांचं विक्रमी कर संकलन झालं होतं.
दुसरीकडे, महाराष्ट्रातही विक्रमी जीएसटी संकलन झालं आहे. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात २३ हजार कोटींचं जीएसटी संकलन झालं आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात दोन हजार कोटींचं अधिक संकलन झालं आहे. जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे. कर्नाटकमध्ये ऑक्टोबर महिन्यात एकूण १० हजार ९९६ कोटींचं जीएसटी संकलन झालं आहे.