नांदेड  – जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा गाजल्यानंतर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी अवैध वाळू उपसा व विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून मंगळवार (दि.११) रोजी मध्यरात्री बिलोली तालुक्यातील गंजगाव वाळू घाटावरून २ जेसीबींसह २३ हायवा टिप्पर जप्त केले आहेत. त्यांच्यावर बिलोली पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या साहित्याची किंमत ३ कोटी १५ लाख १४ हजार रूपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नांदेड जिल्ह्यात वाळू घाटावर अनाधिकृतपणे वाळुचा उपसा करून तो इतर जिल्ह्यांत विक्रीला जात असल्याची बाब जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांसमक्ष उघड केली होती. पोलिसांच्या हप्तेखोरी धोरणांमुळे हा प्रकार सर्रास चालू असल्याचा आरोपही करण्यात आला होता.

या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी अवैध वाळू उपसा व विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांसमक्ष सांगितले होते. यानुसार त्यांनी ऑपरेशन फ्लशआऊट अंतर्गत नांदेड जिल्ह्यात वाळू माफीयांकडून अवैध मार्गाने वाळुचा उपसा व वाहतूक तसेच चोरट्या मार्गाने विक्री करणार्‍या व शासनाचा महसूल बुडवणार्‍यांवर वाळू माफीयांवर कठोर कारवाई करण्यास सुरू केले आहे.

मंगळवारच्या पहाटेपर्यंत बिलोली तालुक्यातील गंजगाव येथील खाजगी वाळू घाटावर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, रफीक चांद शेख यांनी कारवाई करत दोन जेसीबी मशिनसह २३ हायवा टिप्पर रेतीसह जप्त केले आहेत. या प्रकरणात आरोपी गणेश रामराव हिवराळे, जाकेर खान मिर्झा खान या दोघांसह अन्य टिप्पर व जेसीबीच्या चालक व मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या साहित्याची किंमत ३ कोटी १५ लाख १४ हजार रूपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस दलाच्या या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 23 trucks 2 jcbs seized by police administration over illegal sand mining zws