सोलापूर : पाण्याने भरलेल्या ओढ्यात विजेची तार तुटून पडली असतानाच त्यात उतरलेल्या २४ म्हशी विजेचा धक्का बसून जागीच मृत्युमुखी पडल्या. उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथे सायंकाळी हा दुर्दैवी प्रकार घडला.

सोलापूर-बार्शी रस्त्यावर गुळवंची गावात राहणारे हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे या दोन्ही बंधुंचा दुग्ध उत्पादन व गोपालनाचा व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे हरिदास भजनावळे यांनी म्हशी चारण्यासाठी गुळवंची शिवारात नेल्या होत्या. तेथेच असलेल्या ओढा प्रवाहीत झाला असताना त्या ओढ्यात विजेची तार अगोदरच तुटून पडली होती. परंतु त्याचा अंदाज भजनावळे यांना आला नव्हता. म्हशी ओढ्याजवळ जाऊन पाण्यात उतरल्या. तेव्हा काही क्षणातच सर्व २४ म्हशी जागीच गतप्राण झाल्या. ही बाब भजनावळे यांना लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून उर्वरीत चार म्हशींना ओढ्यात उतरण्यापासून रोखले. त्यामुळे त्या चार म्हशींचे प्राण वाचले.

हेही वाचा >>>सुरत-चेन्नई हरित महामार्गासाठी बाधित शेतकऱ्यांची सोलापुरात परिषद

दरम्यान, ही घटना समजताच गावकरी संतप्त होऊन रस्त्यावर आले. महावितरणच्या गलथान कारभारामुळेच विजेची तार तुटून ओढ्यात पडली आणि त्यातून २४ म्हशींना प्राण गमवावे लागल्याबद्दल गावक-यांनी संताप व्यक्त करीत रास्ता रोको केला. दरम्यान, महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर घटनेचा पंचनामा करावा आणि म्हशींच्या प्राणहानीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली.