सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील तीन विधानसभा मतदारसंघात २४ उमेदवार रिंगणात आहेत. कणकवलीत राणे यांचे सुपुत्र नीतेश राणे यांच्यासमोर काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांनी बंडखोरी केली असून, सावंतवाडी मतदारसंघात पंचरंगी लढत होत आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार प्रमोद जठार यांच्यासमोर काँग्रेसने राणेंचे सुपुत्र नीतेश राणे यांना रिंगणात उतरविले आहे. काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून राणे यांना धोबीपछाड करण्याचे जाहीर केले आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघात आठ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अतुल रावराणे (राष्ट्रवादी) चंद्रकांत जाधव (बसपा), प्रमोद जठार (भाजप), नीतेश राणे (काँग्रेस), सुभाष मयेकर (शिवसेना), विनय सावंत (अपक्ष), विजय सावंत (अपक्ष) व डॉ. तुळशीदास रावराणे (प्रिझण्टस अ‍ॅण्ड वर्कर्स पार्टी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अतुल रावराणे, सुभाष मयेकर यांनी अनुक्रमे राष्ट्रवादी व शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उडी घेतली असली तरी या मतदारसंघात काँग्रेसचे नीतेश राणे व भाजपाचे प्रमोद जठार यांच्यात मुख्यत्वे लढत होणार आहे.
कुडाळ मतदारसंघात नारायण राणे
कुडाळ विधानसभा मतदारसंघात सहा उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यासमोर शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांना शिवसेनेने रिंगणात उतरविले आहे. राणे व नाईक यांच्यातच लढत होणार आहे.
रवींद्र कसालकर (बसपा), वैभव नाईक (शिवसेना), नारायण राणे (काँग्रेस), पुष्पसेन सावंत (राष्ट्रवादी), बाबा ऊर्फ विष्णू मोंडकर (भाजप) व स्नेहा केरकर (अपक्ष) रिंगणात आहेत.
माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुष्पसेन सावंत हे मागील निवडणुकीत रिंगणात होते. त्या वेळी नारायण राणे व वैभव नाईक यांच्यात लढत होऊन राणेंचे मताधिक्य घटविण्यात नाईक यांना यश आले होते.
नारायण राणे यांच्याविरोधात कुडाळ-मालवण मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत मुद्दे निर्माण झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक रंगतदार आहे. या मतदारसंघातील राणे, नाईक व सावंत हे उमेदवार मराठा समाजातील असल्याने मराठा समाजातील मताधिक्य कोणाला मिळते त्याकडे निवडणूक निकाल झुकेल, अशी चर्चा आहे.
सावंतवाडीत दीपक केसरकर
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १० उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणी पाचही पक्षांनी उमेदवार दिले आहेत. राणे यांच्या विरोधात दीपक केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेचा वचपा काढण्यासाठी राणे केसरकर यांच्या विरोधात तगडा उमेदवार देतील, अशी चर्चा होती, पण आघाडीत बिघाडी व युतीत घटस्फोट झाल्याने या ठिकाणी पंचरंगी लढत होत आहे.
सावंतवाडी मतदारसंघात परशुराम उपरकर (मनसे), चंद्रकांत गावडे (काँग्रेस), वासुदेव जाधव (बसपा), राजन तेली (भाजप), सुरेश दळवी (राष्ट्रवादी), दीपक केसरकर (शिवसेना), उदय पास्ते (अपक्ष) किशोर लोंढे (अपक्ष), संजय देसाई (अपक्ष) व अजिंक्य गावडे (हिंदू महासभा) असे उमेदवार रिंगणात आहेत.
सावंतवाडीत पाचही पक्षाचे उमेदवार तगडे
दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीच्या आमदारकीचा त्याग करीत शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात आहेत. राजन तेली काल-परवापर्यंत नारायण राणे सोबत होते. गेल्या महिनाभरात काँग्रेस, अपक्ष, राष्ट्रवादी व भाजपा असा त्यांचा प्रवास झाला. एक महिन्यापूर्वी शिवबंधनात अडकलेले सुरेश दळवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर परशुराम उपरकर मूळचे शिवसेनेचे आमदार होते, पण वर्षांपूर्वी मनसेत प्रवेश केला.
या पाचही उमेदवारांचा मतदारसंघात पक्ष व उमेदवार म्हणून स्वत: दौरा झाला आहे. दीपक केसरकर यांच्या मताधिक्यात घट करून मतविभागणीची गणिते काही घालत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत हा मतदारसंघ लक्षणीय लढतीचा आहे.