महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात मागील २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश आहे. अवघ्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला.
औषधांच्या कमतरतेमुळे हे मृत्यू झाल्याचे शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. रुग्णालयाच्या डीनने सांगितलं की, मृतांमध्ये १२ नवजात मुलं होती. यामध्ये सहा मुली आणि सहा मुलांचा समावेश आहे. तर इतर बारा लोकांचा मृत्यू सर्पदंशासह विविध गंभीर आजारांमुळे झाला. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.
रुग्णालयाच्या डीनने पुढे सांगितलं, हे तीन स्तरीय सुविधा असणारं रुग्णलय आहे. परंतु जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील रुग्ण येथे येतात. कारण ७० ते ८० किमीच्या परिघात हे एकमेव आरोग्य सेवा केंद्र आहे. रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या काही वेळा संस्थेच्या बजेटपेक्षा जास्त असते आणि त्यामुळेच रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला, असेही ते म्हणाले.
हॉस्पिटल हाफकिन नावाच्या संस्थेकडून औषधे खरेदी करणार होतं. परंतु तसे झाले नाही. रुग्णांना स्थानिक स्टोअरमधून औषधे विकत घेऊन उपचार करण्यात आले, अशी माहिती शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या डीनने दिली.