सांगली : रेणावी (ता.खानापूर) येथे एका शेतात छापा टाकून विटा पोलीसांनी सुमारे १० लाख रूपये मूल्याची २४० गांजाची झाडे जप्त केली. आज मध्यरात्री पोलीसांनी केलेल्या कारवाईमध्ये १०० किलो गांजा जप्त करून शेतमालकाला ताब्यात घेतले आहे. विटा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पोलीसांना रेणावी येथे शेतात गांजा लागवड केली असल्याची माहिती मिळाली.
हेही वाचा >>> राज्यातील १० टक्के मराठा आरक्षण टीकवण्यासाठी सरकार काय प्रयत्न करणार? शंभूराज देसाईंचं थेट उत्तर; म्हणाले…
पोलीसांच्या पथकाने पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे राजाराम आनंदा गुजले (वय ५०, रा. रेणावी) यांच्या शेतात छापा टाकला. तर उसाच्या फडात तीन ते पाच फूट उंचीची २४० गांजाची झाडे आढळून आली. याचे वजन १०० किलो ७०० ग्रॅम असून त्याचे बाजारातील मूल्य १० लाख ७ हजार रूपये आहे. सदर गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून शेतमालक गुजले याला ताब्यात घेउन त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई विटा पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपनिरीक्षक विशाल येळेकर, किरण खाडे, उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, विलास मोहिते आदींच्या पथकाने केली.