अहिल्यानगरः थकबाकी वसुलीसाठी महावितरणने सुरू केलेल्या मोहिमेत मार्च महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील २४५४ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई आत्तापर्यंत केली आहे. जिल्ह्यातील एकूण २ लाख १ हजार ९६१ ग्राहकांकडे ३३२ कोटी ६९ लाख रुपयांची थकबाकी निर्माण झालेली आहे. यामध्ये कृषी ग्राहकांकडील थकबाकीचा समावेश नाही.

थकबाकी वसुलीसाठी महावितरणने पथके नियुक्त केली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात घरगुती वर्गवारीतील १ लाख ७५ हजार ग्राहकांकडे १८ कोटी ८४ लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील १४४९ ग्राहकांकडे ४ कोटी २७ लाख औद्योगिक वर्गवारीतील १७२२ ग्राहकांकडे २ कोटी ६७ लाख, पथदिवे वर्गवारीतील ३७६८ ग्राहकांकडे २१९ कोटी ६३ लाख, पाणीपुरवठा योजनेतील १६७४ ग्राहकांकडे ८२ कोटी ७९ लाख रुपये  अशी एकूण जिल्ह्यात २ लाख १ हजार ९६१ ग्राहकांकडे ३३२ कोटी ६९ लाख रुपयांची थकबाकी निर्माण झालेली आहे.

मार्चअखेरीच्या वसुलीच्या उद्दिष्टासाठी महावितरणने मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी पथके नियुक्त केली आहेत. तत्पूर्वी नोंदणीकृत मोबाईलवर, ईमेलवर वीजपुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. या नोटीसचा कालावधी संपताच थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मार्च महिन्यात २ हजार ५४५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. आता वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी थकबाकीदारांना पुनर्जोडणी शुल्क भरावे लागणार आहे. दरमहा सातत्याने पाठपुरावा करूनही, ग्राहकांना संपर्क करूनही वीज देयकाची थकबाकी महावितरणसाठी चिंतेचा विषय बनली आहे. वीजग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाईलवर महावितरणकडून मीटर वाचन, वीज देयकाचे संदेश पाठवले जातात. मात्र तरीही वीज देयके अदा करण्याकडे ग्राहक दुर्लक्ष करत असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे. त्यातूनच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.