रत्नागिरी शहर आणि परिसरात गेले पाच दिवस सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत आजअखेर तब्बल २८ डंपर अविघटनशील कचरा गोळा करून विल्हेवाट लावण्यात आली आहे. शहराच्या स्वच्छता मोहिमेतील हा एक नवा विक्रम मानला जातो.
शहरातील या मोहिमेचा प्रारंभ गेल्या शुक्रवारी (४ एप्रिल) येथील थिबा राजवाडा परिसरात सुरू झाला. शहराची व्याप्ती लक्षात घेता या महिनाअखेपर्यंत शहराच्या विविध भागांत लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, युवक आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाने ही मोहीम राबवण्यात येत आहे. दररोज सकाळी ८ ते १२ आणि दुपारी २ ते ६ या वेळात होणाऱ्या या मोहिमेत संबंधित परिसरातील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या व अन्य अविघटनशील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे.
गेले पाच दिवस चाललेल्या या मोहिमेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब जगताप, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.बी. खोंडके, निवासी उप जिल्हाधिकारी एस.आर. बर्गे, आमदार उदय सामंत, माजी आमदार बाळ माने, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, शिरगावचे सरपंच रज्जाक काझी यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी होत आहेत. त्यामुळे शहराच्या विविध भागांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली आहे. तसेच शहरालगतचे ग्रामीण भाग आणि खाडय़ांच्या परिसरातही स्वच्छता करण्यात आली.    
जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या मोहिमेत प्लास्टिक कॅरीबॅग किंवा पिशव्यांवर बंदी घालण्यात आली असून त्या ऐवजी कागदी व कापडी पिशव्यांच्या निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शहराची व्याप्ती लक्षात घेता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत सर्व प्रभागांमध्ये मोहीम पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर स्थानिक स्वयंसेवी संस्था व नागरिकांवर स्वच्छता राखण्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे.
दरम्यान जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात समांतरपणे चालू असलेल्या या मोहिमेअंतर्गत आज जिल्हाधिकारी जाधव यांच्या उपस्थितीत लांजा शहरात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झाला. तहसील कार्यालय ते शासकीय विश्रामगृहापर्यंतच्या परिसरातील तीन डंपर कचरा या वेळी गोळा करण्यात आला. शहरातील विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत या मोहिमेसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे. तसेच शहरात नियमितपणे स्वच्छता राखण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून नगर पंचायतीला टेम्पो उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा