लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : रोहिणी नक्षत्राला सुरूवात होताच सोलापूर शहर व जिल्ह्यात जवळपास सर्व तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. सरासरी २५.१ मिलीमीटर इतका पाऊस होताना दुसरीकडे वादळामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून कोसळले. शेतीबागांचे नुकसान झाले. घरांवरील छपरेही उडून गेल्याने अनेक गोरगरिबांचे संसार उघड्यावर पडले. तर वीज कोसळून एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला.
सायंकाळी रोहिणी बरसण्यास सुरूवात झाली. नंतर रात्री पावसाने जोर धरला होता. काही भागात गारांसह पाऊस झाला. सर्वाधिक ३२.७ मिमी पाऊस सोलापूर शहरासह उत्तर सोलापूर तालुक्यात कोसळला. मोहोळमध्ये २८.४ मिमी तर मंगळवेढ्यात २६.६ मिमी पाऊस कोसळला. अक्कलकोट-२६.५, माढा-२६.४, करमाळा-२५.४, बार्शी-२१.१, पंढरपूर-२०.३, दक्षिण सोलापूर-१९.३, सांगोला माळशिरस-प्रत्येकी १६.६ याप्रमाणे जिल्ह्यात सरासरी २५.१ मिमी पावसाची नोद झाली आहे.
आणखी वाचा-सांगली: आंबा महोत्सवात ४७ जातींचे आंबे
मोहोळ, बार्शी, करमाळा, अक्कलकोट व सर्व भागात वादळी वाऱ्यांमुळे काही फळबागा भुईसपाट झाल्या. अन्य शेतीचेही नुकसान झाले. विशेषतः करमाळा तालुक्यात यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात पाण्याअभावी हजारो एकर क्षेत्रातील केळीबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड चालली असताना वादळाचा जोरदार तडाखा केळीबागांना बसल्यामुळे शेतकरी कोसळला आहे. माढा व मोहोळ तालुक्यातही हेच चित्र दिसून आले. पंढरपूर तालुक्यातील भाटुंबरे येथे वीज अंगावर कोसळल्याने शारदा कल्याण कुंभार (वय ४५) ही शेतकरी महिला मृत्युमुखी पडली. अन्य दोघी महिला जखमी झाल्या.
वादळी वाऱ्यांचा तडाखा वीज यंत्रणेला बसला. यात अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. या दमदार पावसामुळे सोलापूरचे तापमान ४० अंशांवरून थेट ३४.८ अंशांपर्यंत खाल्यामुळे उष्मा कमी झाला. त्यामुळे नागरिकांना दिला मिळाला आहे.