रिक्त पदांमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ताण, मध्यवर्ती कारागहांमध्ये तुडूंब गर्दी
राज्यातील मध्यवर्ती कारागृहांसह सर्व लहानमोठी कारागृहे सध्या कैद्यांनी तुडूंब भरली असून, गेल्या पाच वर्षांमध्ये कारागृहांच्या संख्येत अकराची भर पडली तरी सध्या क्षमतेपेक्षा २५ टक्के जास्त कैदी तुरूंगात वास्तव्याला असल्याचे दिसून आले आहे. तुरुंगांमधील सुरक्षा आणि कैद्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी मंजूर असलेल्या पदांपैकी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुमारे २५ टक्के पदे रिक्त असताना कैद्यांच्या वाढत्या संख्येने यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
कारागृह विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ९ मध्यवर्ती आणि ४५ जिल्हा कारागृहे आहेत. त्यात खुले कारागृह आणि महिला कारागृहांचाही समावेश आहे. सध्या राज्यातील कारागृहांची क्षमता २३ हजार ९४२ असताना २९ हजार ३५८ कैदी आहेत. म्हणजेच कैद्यांचे प्रमाण १२३ टक्के आहे. त्यात पक्क्य़ा कैद्यांचे प्रमाण २७ टक्के आणि कच्च्या कैद्यांचे प्रमाण तब्बल ७३ टक्के आहे. राज्यातील येरवडा, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या मध्यवर्ती कारागृहांमध्ये प्रचंड गर्दी असून, क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी ठेवण्यात आले आहेत. राज्यातील कारागृहांमध्ये दरवर्षी सव्वा लाखांहून अधिक कच्चे आणि पक्के कैदी येण्याचे सरासरी प्रमाण आहे. यापैकी ६६ टक्के कैदी जामिनावर सुटतात, तर शिक्षा सुनावली जाण्याचे प्रमाण ३४ टक्के आहे. गुन्हेगारांमध्ये सुधारणा घडवून आणणे, त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना व्यवसायाभिमूख प्रशिक्षण देणे हे कारागृह प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मात्र, कैद्यांच्या संख्येचा विचार करता कारागृहांमधील मनुष्यबळ अल्प आहे. त्यामुळे कैद्यांचे समुपदेशन तर दूरच त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देणेही अवघड बनले आहे. अलीकडे कारागृहांमधून कैद्यांचे पलायनही वाढले आहे. मुंबई मध्यवर्ती कारागृहाची क्षमता ८०४ असताना तेथे तब्बल २ हजार ७४१ कैदी आहेत. येरवडय़ाची क्षमता २४४९ असताना येथे ४ हजार ११७ कैदी कोंबलेले आहेत. ठाणे मध्यवर्ती कारागृहात ११०४ कैदी ठेवले जाऊ शकतात, पण सध्या येथे २७५६ कैदी आहेत. औरंगाबादेत ५७९ ऐवजी ११७९ कैदी ठेवले आहेत. नागपूर मध्यवर्ती कारागृहाची बंदीक्षमता १८४० असताना २१०८, तर अमरावती मध्यवर्ती कारागृहात ९७३ या क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे, १०७९ कैदी आहेत. वर्ग १, २ व ३ च्या जिल्हा कारागृहांचीही हीच स्थिती असून अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरचा ताण वाढला आहे.
खुल्या कारागृहांची स्थिती बरी
तुलनेत खुल्या कारागृहांची स्थिती बरी आहे. आटपाडी खुल्या वसाहतीत १२, मुंबई जिल्हा महिला कारागृहात २१८, येरवडा महिला कारागृहात ४२, मोर्शी खुल्या कारागृहात १३७, कोल्हापूर, नाशिकरोड, नागपूर, ठाणे या खुल्या कारागृहांमध्ये अधिकृत क्षमतेपेक्षा सध्या कमी कैदी आहेत. कारागृह उपमहानिरीक्षक, मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहांचे अधीक्षक, तुरुंगाधिकारी, सुभेदार, हवालदार, रक्षक आणि प्रशासकीय पदे मिळून कारागृह विभागात सुमारे ५ हजार ६४ पदे मंजूर असून ३ हजार ७४९ पदे भरण्यात आली आहेत. अजूनही १३१३ पदे रिक्त आहेत, अशी माहिती कारागृह विभागातील सूत्रांनी दिली.