परभणी जिल्ह्यातून केदारनाथ यात्रेस गेलेल्या २५ यात्रेकरूंचा आठ दिवसांनंतरही कुटुंबीय किंवा नातेवाईकांशी संपर्क होऊ शकला नाही. जिल्हा प्रशासनानेही २५ यात्रेकरू बेपत्ता असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. बेपत्ता यात्रेकरूंचा संपर्क होत नसल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतातूर आहेत.
परभणी जिल्ह्यातील ४२ भाविक गेल्या ५ जूनला अंबिका ट्रॅव्हल्सने केदारनाथ यात्रेस गेले होते.  १५ व १६ जून दरम्यान तेथे ढगफुटी झाली. त्यामुळे हे यात्रेकरू गौरीकुंडमध्ये अडकले. या दोन दिवसांदरम्यान यात्रेकरूंचा कुटुंबीयांशी संपर्क झाला. नंतर मात्र या यात्रेकरूंची माहिती मिळत नव्हती. चार दिवसांपूर्वी डॉ. अशोक सेलगावकर यांच्याशी, तसेच रेणुकादास देशपांडे यांच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला; पण देशपांडे हे वडिलांची औषधे आणण्यास लॉजवर परतले व लॉज जमीनदोस्त झाले. या घटनेत देशपांडे यांचे काय झाले असावे, या विषयी त्यांचे कुटुंबीय चिंतातूर आहे.
रविवारी हेलिकॉप्टरद्वारे १४ भाविकांना हरिद्वार येथे सुखरूप पोहोचविण्यात आले. परंतु इतर यात्रेकरूंचा सोमवारी सायंकाळपर्यंत संपर्क होऊ शकला नव्हता. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील बेपत्ता भाविकांची यादी राज्य सरकार व उत्तराखंड सरकारला पाठविली आहे. रेणुकादास देशपांडे चारठाणकर, राजाराम दिनकरराव धाबे, सुरेखा राजाराम धाबे, रमेश मनोहरराव जोशी, सुनीता रमेश जोशी, संगीता शरद पाटील, शरद सीताराम पाटील, रमेशराव पांडे, उषा रमेशराव पांडे, चिंतामणराव देशपांडे, मंगला चिंतामणराव देशपांडे, आशा रमेश डंक, रमेश डंक, सुरेश डंक, जया डंक, दत्तात्रय हरिहरराव पाठक, सुषमा दत्तात्रय पाठक, जयवंत धानोरकर, अलका जयवंत धानोरकर, सुरेश डहाळे, पद्मावती सुरेश डहाळे, विमल नारायण शहाणे (सर्व परभणी) व झरी येथील दिगंबरराव एकनाथराव जोशी, राणी दिगंबरराव जोशी, सेलू येथील सुशीला राजाभाऊ पाठक यांचा आठ दिवसांपासून संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, केदारनाथ, गौरीकुंड आदी ठिकाणी अजूनही दहा हजार भाविक अडकले आहेत. यात परभणी जिल्ह्याचे यात्रेकरू असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा