श्री महालक्ष्मी देवस्थान विकासाचा २५० कोटी रूपयांचा आराखडा सादर करण्यात आला आहे. महालक्ष्मी मंदिर व शहराचा पर्यटन विकास या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून याची निर्मिती केली गेली आहे. तीन टप्प्यात होणाऱ्या या कामाच्या पहिल्या टप्प्यासाठी येत्या अधिवेशनात निधी मंजूर करून घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  येथे दिली. तसेच मंदिर परिसरातील जागा संपादनाचा विषय चच्रेने सोडवून त्या संपादन होतील तसे तेथे कामास सुरवात करावी, अशी सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला देण्यात आली. विकास अंतर्गत काही कामे खाजगी मदतीतून, लोकसहभागातून करण्यात येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
महालक्ष्मी देवस्थान विकासाबाबत मुंबईच्या फोटोटेंस कंपनीने आराखडा तयार केला आहे. येथील शासकीय विश्रामगृहावर आज कंपनीचे संचालक ए. एस. कुमार यांनी हा आराखडा सादर केला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, भाजपचे शहराध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते.
 विकास आराखडय़ामध्ये सध्या मंदिरा शेजारील असलेले व्यावसायिक व रहिवाशी असा ४० मीटरचा परिसर रिकामा करून घेणे, या ठिकाणी भाविकांची संख्या वाढल्यास रांगेच्या सोयीसाठी क्यू कॉम्पलेक्स (दर्शन मार्गावर इमारत) उभारणे, प्रसादालय, सभामंडप, मंदिरातील दुकानदारांसाठी की कॉम्प्लेक्सची उभारणी, आदी बाबींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. यावर मंत्री पाटील यांनी रहिवासी व व्यापाऱ्यांना हटवून या जागा संपादन करण्याची प्रक्रिया मोठी आहे. याबाबत विरोध, मोच्रे, न्यायालयीन बाबी या शक्यताही नाकारता येणार नाहीत. विद्यापीठ हायस्कूल प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. त्यांना पर्यायी जागा देण्याचा प्रश्नही महत्वाचा ठरेल. तेव्हा या सर्वाचा विचार करून आयुक्तांनी याबाबतची प्रक्रिया सुरू करावी. एकाच वेळी सर्व जागा संपादन होणे शक्य नाही. पण जसजशा जागा मिळतील तशा पध्दतीने कामकाज सुरू करावे, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला दिली.
आमदार क्षीरसागर म्हणाले, मंदिर परिसरातील रहिवासी व व्यापारी यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नाचा प्रश्न महत्वाचा असून काम हाती घेताना तो सोडविण्यावर भर दिला जावा. रंकाळा तलावाबरोबर कोटीतीर्थ, राजाराम, कळंबा तलावाचाही विकास व्हावा.
विकास आराखडय़ात महत्त्वाचे
* बिंदू चौक व सरस्वती टॉकीज येथे वाहनतळ
* पर्यटन मार्गदर्शन केंद्र
* दर्शन मार्गावर रांग इमारत
* बिंदू चौक ते मंदिर विशेष रस्ता
* महालक्ष्मी मंदिर व नव दुर्गा क्षेत्रांचा विकास
* रंकाळा व पंचगंगा घट विकास
* शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर कमानी
* टेंबलाई टेकडी येथे भक्त निवास

Story img Loader