नांदेड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरील कथित अन्याय आणि त्यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची घोषणा यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजाने नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत २५० पेक्षा अधिक उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रातूनच आरक्षण लढय़ाला नवे वळण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अर्धापूर या तालुक्यातील पिंपळगाव (महादेव) ग्रामपंचायतीने गावातल्या दहा मराठा युवकांना लोकसभा निवडणुकीत उतरविण्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर अर्धापूर तालुक्यातून २५० मराठा युवकांना निवडणुकीत उभे करण्याचे ठरले असून अशा राजकीय कृतीतून राज्य सरकारविरुद्धचा असंतोष व्यक्त केला जाणार आहे. अर्धापूर येथे झालेल्या बैठकीला विविध नेत्यांसह सुमारे शंभर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
हेही वाचा >>>“…तर आम्ही भाजपा-आरएसएसबरोबर जाऊ शकतो”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
मराठा आरक्षण आंदोलनात इतर राजकीय नेत्यांच्या तुलनेत अशोक चव्हाण यांच्यावर अधिक टीका केली जात होती. मराठा आरक्षणासाठी त्यांनी काँग्रेस पक्षात असताना भाजपच्या धोरणाचा समाचार घेतला. पण गेल्या महिन्यात भाजपत प्रवेश करून त्यांनी आपले राजकीय स्थान सुरक्षित केले. ही बाब सकल मराठा समाजाला खटकली. याची जाणीव झाल्यावर चव्हाण यांनी वेगवेगळय़ा माध्यमातून मराठा मतदारांचा संभाव्य कल जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.
चव्हाण यांचा प्रभाव असलेल्या भोकर मतदारसंघात तीन तालुके समाविष्ट असून या तालुक्यात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांची संख्या अधिक आहे. त्यांनी राजकीय लढाईचा प्रसार व प्रचार सुरू केला आहे. मराठा समाजातील कोणत्याही मोठय़ा नेत्याने मतप्रदर्शन केलेले नाही किंवा लढाई पुकारणाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला नाही, याकडेही लक्ष वेधण्यात आले.