मुंबई : राज्यातील बहुतेक सर्व तुरुगांमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक कैदी असल्यामुळे यापैकी अनेक कैद्यांना वेगेवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये मनोरुग्णांची संख्याही फार मोठी असल्याचे आरोग्य विभागातील उच्चपदस्थांचे म्हणणे आहे. ‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार, सध्या राज्यातील सर्व तुरुंगात मिळून सुमारे अडीच हजार मनोरुग्ण कैदी आहेत. या कैद्यांसाठी मानसोपचारासाठी आवश्यक असलेली औषधेही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सूत्रांचे म्हणणे आहे. आरोग्य विभागात मनोविकृती चिकित्सकांच्या मंजूर ९७ पदांपैकी ८१ पदे रिक्त आहेत.

महाराष्ट्रात एकूण ६० कारागृहे असून यामध्ये नऊ मध्यवर्ती, ३१ जिल्हा तर १९ खुली आणि एक खुले महिला कारागृह आहे. या सर्व कारागृहांची एकूण क्षमता २४ हजार ७२२ इतकी असून जानेवारी २०२३ अखेरीस या कारागृहात एकूण ४१ हजार ७५ बंदी होते. यामध्ये ३९ हजार ५०४ पुरूष तर १५५६ महिला आणि १५ तृतीयपंथी कैद्यांचा समावेश आहे. राज्यातील सर्व कारागृहात क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त कैदी असून प्रामुख्याने यात मुंबई, ठाणे, येरवडा आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहांचा समावेश आहे. मुंबईतील कारागृहात क्षमतेपेक्षा ३२५ टक्के अधिक तर ठाणे कारागृहात २८८ टक्के, येरवडा येथे १८० टक्के आणि नागपूर कारागृहात ५६ टक्के क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात काही आमदारांनी मांडला होता. वेगवेगळ्या तुरुंगातील कोठडीत क्षमतेपेक्षा जास्त कैदी व त्यांना योग्य त्या आरोग्य विषयक सुविधा मिळत नसल्यामुळे अनेक कैद्यांना त्वचाविकारांचा त्रास होतो तसेच मानसिक आजारांचाही त्रास मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे तुरुंगातील तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Primary teachers across the state on leave for protest tomorrow
राज्यभरातील प्राथमिक शिक्षक उद्या आंदोलनासाठी रजेवर… शाळा बंद राहणार?
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
flood in nagpur on Ambazari lake due to vivekanand statue
नागपूर :पुरासाठी पुतळा कारणीभूत ठरला का ? एक वर्षांनंतरही प्रश्न अनुत्तरित
Electricity rates will decrease In state
खुशखबर… विजेचे दर घटणार! राज्यात युनिटमागे एवढ्या रुपयांची…
CBSE syllabus in Maharashtra state board schools
स्टेट बोर्डाच्या शाळांमध्येही आता ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम; पुढील शैक्षणिक वर्षापासून…
woman self help groups marathi news
यंदाचा गणेशोत्सव बचत गटांसाठी आर्थिक फलदायी, विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीतून १५ लाखांहून अधिकची आर्थिक उलाढाल
tribal development department
आश्रमशाळांमध्ये परिचारिकांची पदे भरणार, आदिवासी विकास विभागाचा निर्णय
suicides farmers Vidarbha, suicides farmers,
आठ महिन्यांत ६९८ आत्महत्या, विदर्भातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था

आरोग्य विभागाच्या एका अहवालानुसार, अमरावती मध्यवर्ती कारागृहात मानसिक आजाराचे सर्वाधिक म्हणजे ९७४ रुग्ण असून त्यापाठोपाठ ठाणे मध्यवर्ती कारागृहाचा क्रमांक लागतो. ठाणे मध्यवर्ती कारागृहात २०० मनोरुग्ण कैदी असून गेल्या महिन्यात येथे मानसिक आजारावरील उपचारांची औषधे कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे आढळून आले होते. तथापि तुरुंग प्रशासनाने औषध उपलब्धतेसाठी पाठपुरावा केला असून कैद्यांना योग्य वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठीही पत्यत्न केल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. ठाण्यापाठोपाठ पालघर येथे १५० तर नागपूर मध्यवर्ती कारागृहात ११४ मनोरुग्ण आहेत. रायगड येथील कारागृहात १०९ मनोरुग्ण तर यवतमाळ जिल्हा कारागृहात ८६ मनोरुग्ण आहेत. अकोला येथे ५४ मनोरुग्ण कैदी आहेत तर लातूर व जळगाव येथील कारागृहात अनुक्रमे ५६ व ३८ मनोरुग्ण कैदी आहेत. नाशिक कारागृहात ५० मनोरुग्ण कैदी असून मुंबईतील येरवडा व तळोजा मध्यवर्ती कारागृहातील मनोरुग्ण कैद्यांची माहिती वारंवार विचारूनही आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थांकडून उपलब्ध होऊ शकली नाही. तथापि या दोन्ही मध्यवर्ती कारागृहात मोठया प्रमाणात मानसिक आजारांचे कैदी असून आरोग्य विभागाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार यातील बहुतेक कैदी हे पूर्वी अंमली पदार्थांचे सेवेन करणारे असल्यामुळेच त्याचा फटका त्यांना बसला आहे.

अनेकदा या मनोरुग्ण कैद्यांना नियमितपणे काही विशिष्ठ औषधे द्यावी लागतात. गेले काही महिने या औषधांचा रुग्णालयात तुटवडा असल्याचे दिसून आले आहे. औषधे न मिळाल्यास हे कैदी अस्वस्थ होऊन आरडाओरडा करतात वा प्रसंगी हिंसकही होतात. यातूनच त्यांना गरज असलेले औषध नसल्याने अन्य औषधे देण्यात येतात, असे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. तथापि याबाबत आरोग्य संचालक डॉ. लाळे यांच्यासह कोणीही थेट बोलण्यास तयार नाही. बहुतेक कैदी हे अंमली पदार्थांचे सेवन करणारे असून तुरुंगात त्यांना अंमली पदार्थ मिळू शकत नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार करावे लागतात. त्यांच्यावर मानसिक औषधोपचार केल्यानंतर हे कैदी शांत होतात. तुरुंगविषयक नियमानुसार दाखल होणाऱ्या प्रत्येक कैद्याच्या मानसिक आरोग्याची तपासणी करणे बंधनकारक असते. तथापि अशा प्रकारची तपासणी करण्यासाठी पुरेसे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा अशी तपासणी होत नसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. आरोग्य विभागात मानसोपचारतज्ज्ञ, मनोविकृती चिकित्सक तसेच मनोरुग्ण विषयक परिचारिकांची व मदतनीसांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून त्याचा फटाकाही तुरुंगातील कैद्याच्या मानसिक आरोग्य व उपचाराला बसत असल्याचे एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

ठाणे कारागृहात सुमारे ६०० हून अधिक महिला कैदी असून त्यापैकी शंभरहून अधिक महिलांना मानसिक आजारांसाठी औषधोपचार सुरु आहेत. यातील अनेक महिला नैराश्यग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. महिलांच्या कोठडीत सहा ते आठ महिला कैदी असतात. अपुरी जागा व अस्वच्छता यामुळे झोप न लागण्याचाही त्रास अनेक महिलांना आहे. अशाच प्रकारे अन्य कारागृहांमध्येही महिला कैद्यांची परिस्थिती असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. यातील गंभीरबाब म्हणजे आरोग्य विभागाकडेही मानसिक आजारांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची संख्या पुरेशी नाही. आरोग्य विभागाअंतर्गत मानसोपचारतज्ज्ञ तसेच अन्य कर्मचारी यांचीही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

याबाबत प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील तुरुंगात क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून त्यासाठी नवीन तुरुंग बांधण्याचे काम हाती घेतले आहे. कैद्यांच्या आरोग्याच्या प्रश्नातही आपण लक्ष घालणार आहे. रुग्णांच्या मानसिक आजार तसेच अन्य आजारांविषयी संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या जातील. तसेच रुग्णांच्या आरोग्याच्या प्रश्नांची योग्य ती काळजी घेतली जाईल.