सोलापूर : अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढला. परंतु त्याच वेळी हे कृत्य प्रियकराच्याही जिवावर बेतले. दोघांचाही जीव गेला. बार्शी तालुक्यातील पांगरीजवळ हा प्रकार घडला. या घटनेची नोंद पांगरी पोलीस ठाण्यात झाली असून, सरकारतर्फे हवालदार श्रीहरी घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, संबंधित महिलेसह मृत प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. महिलेला अटक झाली नसून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.

एका ३५ वर्षांच्या विवाहित महिलेसोबत तिच्याच गावातील एका २६ वर्षांच्या तरुणाचे अनैतिक संबंध होते. या संबंधांबाबत महिलेचा पती (वय ४०) अडथळा ठरत असल्यामुळे संबंधित महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढण्याचा कट रचला. त्यानुसार कामाचे निमित्त करून मध्यरात्री महिलेच्या पतीला पांगरीजवळ एका गावात नेण्यात आले. तेथे एका तलावाच्या पुलावर प्रियकराने महिलेच्या पतीला अचानक पाण्यात ढकलून दिले. परंतु त्याच वेळी महिलेच्या पतीने पाण्यात पडताना पत्नीच्या प्रियकराच्या गळ्याला धरले. यामुळे तोदेखील पाण्यात पडला आणि एकाच वेळी दोघांचाही मृत्यू झाला. हा प्रकार २४ तासांनंतर निदर्शनास आला. पांगरी पोलिसांनी मृतांची ओळख पटवून तपास केला असता, घटनेची पार्श्वभूमी समोर आली.

Story img Loader