अलिबाग : रायगड जिल्ह्यात वर्षभरात ७३२ रस्ते अपघातांची नोंद झाली. ज्यात २६६ जणांचा मृत्यू झाला. तर ६२४ जण गंभीर जखमी झालेत. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असले तरी अपघातात मृत्यु होणाऱ्यांची संख्या घटली आहे. जखमींच्या संख्येत वाढ झाली आहे.
कोकणातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत रायगड जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होणारी अवजड वाहतूक, वाहनचालकांची बेपर्वाई आणि वाहतूक नियमांकडे केलेले दुर्लक्ष ही अपघतांमागील प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्याची गरज आहे.
रायगड जिल्ह्यातून सात प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जातात. यात मुंबई गोवा महामार्ग क्रमांक ६६, मुंबई पुणे दृतगती महामार्ग आणि मुंबई पुणे महामार्ग क्रमांक ४ या वडखळ अलिबाग महामार्ग, दिघी माणगाव ताम्हाणी घाट महामार्ग, खोपोली वाकण आगरदांडा महामार्ग आणि पेण खोपोली महामार्ग या राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे. सातही महामार्गांचा विचार केल्यास मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण उर्वरीत महामार्गांच्या जास्त आहे.
आणखी वाचा-महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा मधाचे गाव ‘मांघर’वर! प्रजासत्ताक दिन भारत पर्व प्रदर्शनात सहभागी होणार
जिल्ह्यात वर्षभरात मुंबई गोवा महामार्गावर १५४ अपघात झाले यात ६१ जणांचा मृत्यू झाला. मुंबई पुणे दृतगती मार्गावर ११८ अपघात झाले. यात ४१ जणांचा मृत्यू झाला. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर ७६ अपघातांची नोंद झाली ज्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या आकडेवारीचा विचार केला तर जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के या तीन महामार्गावरच होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे रस्ते अपघात रोखण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे.
अपघातांची कारणे….
अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, तीव्र उतार, चुकीच्या आणि वाहन चालकांचा बेदरकारपणा हि अपघातामांगची प्रमुख कारणे आहेत. तर दृतगती मार्गावर लेनची शिस्त न पाळणे, वेग मर्यादा न पाळणे, गाडांचे टायर फुटणे हि अपघातां मागणी प्रमुख कारणे आहेत. या शिवाय दारू पिऊन गाडी चालवणे, चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेकींग करणे यामुळेही अपघात होत आहेत. मुंबई पुणे दृतगती मार्गावर ट्रक चालकांकडून घाट उतारावर वाहने न्यूट्रल गिअरवर चालवली जातात. ज्यामुळे वाहनांवरील ताबा सुटतो आणि अपघात होतात. मुंबई गोवा महामार्गावर संथगतीने सुरु असणारे रुंदीकरण काही अपघातांना कारणीभूत ठरते आहे. औद्योगिकरणामुळे अरुंद रस्तांवर वाढलेली अवजड वाहतूक हे देखील अपघांचे प्रमुख कारण आहे.
या उपाय योजनांची गरज
मुंबई गोवा महामार्गाचे सध्या चौपदरीकरण सुरु आहे. यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी डायव्हरर्जन्स( पर्यायी मार्ग ) टाकण्यात आले आहेत. मात्र पर्यायी मार्गाचे सुचना फलक नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांचा गोंधळ उडतो. आणि अपघात होतात. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी वाहन चालकांना सुचना देणारे फलक बसवण्याची मागणी केली जात आहे. मुंबई पुणे दृतगती मार्गावर लोणावळा ते खालापूर दरम्यान तीव्र उतारावर अपघातांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या ठिकाण वाहनांचा वेग नियंत्रित करणे, वाहन चालकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.
आणखी वाचा-अलिबागजवळ समुद्रात मच्छीमार बोट बुडाली, १५ खलाशी सुखरूप
सुट्टीच्या दिवशी वाहतुक नियमनाची मागणी
वाहतूक पोलीस आणि महामार्ग पोलीसांकडून महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येतात. सुट्टीच्या दिवशी दृतगती मार्गावरील अवजड वाहतुक नियंत्रित केली जाते. त्याच धर्तीवर मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतुक सुट्टीच्या कालावधीत नियंत्रित करण्याची मागणी आता केली जात आहे
रायगड जिल्ह्यातील अपघातातील आकडेवारी काय सांगते…
वर्ष | अपघात | मृत्यू | जखमी |
२०१९ | ९९१ | २१६ | ६१३ |
२०२० | ५९६ | २०६ | ४०९ |
२०२१ | ६८८ | २३६ | ३७९ |
२०२२ | ७२४ | २७६ | ६८९ |
२०२३ | ७०० | २८१ | ५९३ |
२०२४ | ७३२ | २६६ | ६२४ |
रायगड पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या हद्दीत २०२३ मध्ये ७०० अपघातांची नोंद झाली होती. यात २८१ जणांचा मृत्यू झाला होता. तर ५९३ जणांचा मृत्यू गंभीर जखमी झाले होते. २०२४ मध्ये ७३२ अपघातांची नोंद झाली होती. यात २६६ जणांचा मृत्यू झाला होता. तर ६२४ जण गंभीर जखमी झाले. २२० किरकोळ जखमी झाले. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये अपघांतांचे प्रमाण ३२ ने घटले. मात्र अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाश्यांची १५ ने घटली मात्र गंभीर जखमींची संख्या ४० ने वाढली.
वाहनचालकांचा बेदरकारपणा आणि वाहतुक नियमांकडे केलेले दुर्लक्ष अपघातांना कारणीभूत ठरते. देशात नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत असतात. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुक नियमांचे पालन करायला हवे, वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवायला हवे. चालकांचे प्रबोधन करण्याचे प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत. त्यात काही प्रमाणात यशही येत आहे. -सोमनाथ लाडे, वाहतूक पोलीस निरीक्षक रायगड