मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बांधण्यात आलेला अटल सेतू म्हणजेच मुंबई पारबंदर प्रकल्प (शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतू) पूर्ण झाला असून वाहतूक सेवेसाठी सज्ज झाला आहे. या सागरी सेतूचे १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाच्या निमित्ताने मोदी पुन्हा मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अटल सेतूची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या अटल सेतूची वैशिष्ट्ये विषद केली.
“२२ किमीचा लांबलचक सी ब्रीजचे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शूभहस्ते लोकार्पण होणार आहे. शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बरमुळे मुंबई ते रायगडचा दोन तासांचा प्रवास २० मिनिटांवर येणार आहे. पुढचा टप्पा आहे वरळीवरून कोस्टल असेल. यामुळे मुंबईतील माणूस १५-२० मिनिटांत रायडला पोहोचणार आहे. जिथे हा सागरी सेतू संपतोय तिथून मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गाला जोडण्यात येणार आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा >> विश्लेषण : शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू मुंबई आणि नवी मुंबईसाठी किती फायदेशीर? काय आहेत वैशिष्ट्ये?
“तसंच, वसई-विरार-अलिबाग मल्टि मॉडेल कॉरिडॉर जोडले जात आहे. या सागरी सेतूला अधिकाधिक महामार्ग जोडले जाणार आहेत. त्यामुळे हा सागरी सेतू म्हणजे फक्त समूद्र पूल नव्हे तर हा गेमचेंजर प्रकल्प आहे”, असंही ते म्हणाले.
अटल सेतूची वैशिष्ट्य काय?
“४ हावडा ब्रीज, २७ आयफेल टॉवर बनतील एवढे साहित्य आहे या सागरी सेतूच्या बांधकामासाठी वापरण्यात आलं आहे. पृथ्वीला दोनदा प्रदक्षिणा होईल एवढे वायर्स वापरले आहेत. तसंच, हा सागरी सेतू पर्यावरणपूरक आहे. येथे येणारे फ्लेमिंगो कमी होऊ नये म्हणून तंत्रज्ञान वापरले आहेत. काम करताना नॉईज बेरिअर वापरले होते. जे जे काय करता येईल ते केलं. पर्यावरणपूरक प्रकल्पासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले. आनंद याचा आहे याचं भूमिपजून मोदींच्या हस्ते झाले होते. तेव्हा देवेंद्र मुख्यमंत्री होती. मधल्या काळात प्रकल्प थंडावला होता. परंतु सर्व स्पीड ब्रेकर हटवले. लाखो लोकांना दिलासा देणारा, वरदान ठरणारा हा प्रकल्प आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
नवी मुंबईत कोणते कार्यक्रम पार पडणार?
उद्या एमटीएचलचं लोकार्पण होईल. रेल्वे, मेट्रो, ऑरेंज गेट ते नरिमन पॉईंटचा टनेल, सूर्या डॅमचेही उद्घाटन होणार आहे. महिला सक्षमीकरणाचा शुभारंभ होणार आहे, लेक लाडकी लखपतीची योजना उद्या लॉन्च होणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.