छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आक्रमक झालेले असताना लगतच्या गडचिरोलीत मात्र पोलिसांनी राबविलेल्या नवजीवन योजनेला प्रतिसाद देत मंगळवारी तब्बल २७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचा मनोदय जाहीर केला. यामुळे सुखावलेल्या पोलिसांनी शरण आलेल्या दोन नक्षलवाद्यांचा विवाह आज धूमधडाक्यात लावून देत अस्सल गांधीगिरीचा परिचय दिला.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये तीन दलम कमांडरसह अनेक कडव्या नक्षलवाद्यांचा समावेश आहे. मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय जाहीर केलेल्या या नक्षलवाद्यांना मंगळवारी पोलिसांनी सर्वासमक्ष बोलते केले. सुरेंद्र नरोटे, नेवरा कोल्हा, शांती कुडीयामी, संताराम उसेंडी, कैलास पुडो, गुलाब नांदगाये, सगनु उसेंडी या नक्षलवाद्यांनी चळवळीत आलेले अनुभव या वेळी कथन केले.
शांती कुडीयामी या १८ वर्षांच्या तरुणीने, चळवळीत तिला झालेला मानसिक व शारीरिक त्रास सर्वाना सांगितला. चळवळीत दाखल झाल्याबरोबर या तरुणीला थेट ओदिशात नेण्यात आले. तेथे अनेक शारीरिक यातना सहन कराव्या लागलेल्या या तरुणीने आई-वडिलांची तब्येत खराब आहे, असे खोटे कारण सांगून पळ काढला. तब्बल १५ दिवसांनंतर ही तरुणी भामरागड तालुक्यातील येचली या गावात असलेल्या स्वत:च्या घरी पोहोचली. पोलिसांची योजना जाहीर झाल्यानंतर तिने आत्मसमर्पणाचा निर्णय जाहीर केला.
नक्षलवादी चळवळीत जीवन या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुरेंद्र नरोटे या तरुणाने आपल्याला बळजबरीने या चळवळीत ओढण्यात आल्याचे सांगितले. २००८ मध्ये झालेल्या लाहेरी हत्याकांडात मी सहभागी होतो, असेही त्याने स्पष्ट केले. या हत्याकांडात १७ पोलीस ठार झाले होते. पोलिसांनी या कार्यक्रमाला अजूनही चळवळीत सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांच्या कुटुंबीयांना मुद्दाम आणले होते. या सर्व कुटुंबीयांसाठी विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची व या कुटुंबांची भेट पोलिसांनी घालून दिली. या सर्वानी स्थानिक भाषेत संवाद साधावा, असेही सुचवण्यात आले होते. त्यामुळे आणखी काही नक्षलवादी शरण येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. चळवळीत असतानाच प्रेम जुळलेल्या सुरेंद्र नरोटे व रेणूका तिम्मा या दोघांचा विवाह पोलिसांनी लावून दिला. या विवाहासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली होती.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार सानुग्रह अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनुपकुमार सिंग, ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार, गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल श्रीरामे, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हय़ातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या हस्ते शरण आलेल्या नक्षलवाद्यांचा  सत्कार  करण्यात आला.
कुटुंबीयांनी प्रवृत्त केले..
गेल्या एप्रिल महिन्यात गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे या हेतूने नवजीवन योजना राबवली होती. या योजनेंतर्गत सर्व अधिकाऱ्यांनी दुर्गम भागात जाऊन चळवळीत सक्रिय असलेल्या सुमारे २५० नक्षलवादी कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या. कुटुंबीयांनीच नक्षलवाद्यांना समर्पणासाठी प्रवृत्त करावे, अशी विनंती केली होती. त्याचा परिणाम होऊन २८ नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतआयोजित एका भव्य कार्यक्रमात आत्मसमर्पण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा