जलसंपदामंत्र्याच्या उपस्थितीत पाणीवाटप बैठक
जायकवाडीत गंगापूर धरण समूहातून पाणी सोडण्यावरून जिल्ह्य़ातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी शनिवारी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध आंदोलन केल्यानंतर अखेर पाणी आरक्षणप्रश्नी सोमवारी मुंबई येथे घेण्यात आलेल्या बैठकीत नाशिक शहरासाठी २७०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय गंगापूर डाव्या कालव्यातून २५०० दशलक्ष घनफूट पाणी तीनवेळा सोडण्यात येणार आहे. १५ जुलैपर्यंत हे आरक्षण राहणार आहे.
जलसंपदामंत्री महाजन आणि सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीवाटप समितीची बैठक झाली. शनिवारी नाशिक येथे झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनाप्रसंगी जलसंपदामंत्र्यांनी समन्यायी पाणीवाटपासंदर्भात मुंबईत बैठक घेण्याची हमी दिली होती. त्यानुसार झालेल्या या बैठकीत अखेर जिल्ह्य़ातील गंगापूर व दारणा धरण समूहातील पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यात आले. सद्य:स्थितीत गंगापूर धरण समूहात ४१४० दलघफू जलसाठा असून सर्व तूट वजा जाता हा साठा ३४८५ दलघफू इतका आहे. बैठकीत ठरल्यानुसार गंगापूर धरण समूहातून नाशिक शहरासाठी २७००, एमआयडीसी ३००, एकलहरे ३००, ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठय़ासाठी १०० दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले. तसेच गंगापूर डावा कालव्यासाठी ७५० दलघफू निश्चित करण्यात आले. दारणा धरण समूहात ७००० दलघफू साठा आहे. त्यात महापालिका क्षेत्रासाठी ३००, ग्रामीण पाणीपुरवठा, देवळाली छावणीसाठी १२७० तर कोपरगाव गोदावरी कालव्यांसाठी ५४३० दलघफू पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
पाणीवाटप झाल्यानंतर खा. हेमंत गोडसे यांनी अशीच प्रक्रिया जायकवाडीला पाणी सोडण्याआधी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन केली असती तर जिल्ह्य़ात असंतोष वाढलाच नसता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच मेंढेगिरी समितीचा गोदावरी अभ्यास गट अहवाल चुकीचा असून त्यांनी दिलेली आकडेवारी व तक्ता बदलविण्यात यावी तसेच या अहवालावर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी गोडसे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व जलसिंचन समितीचे राजेंद्र जाधव यांनी केली. मेंढेगिरी समितीच्या अहवालामुळे गंगापूर समूहावर अन्याय झाला असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केल्यावर महिनाभरात या अहवालासंदर्भात बैठक घेण्याचे जलसंपदामंत्र्यांनी मान्य केले.
गंगापूरमधील ५०० दलघफू पाणी पाटबंधारे खात्याकडून कोपरगावसाठी गोदावरी कालव्यास धरण्यात आले होते. त्यास राजेंद्र जाधव यांनी जोरदार आक्षेप घेतला. गंगापूर कालव्यासाठी पाणी द्यावयास नसताना आपण गोदावरी कालव्यास कसे काय आरक्षण टाकतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्यावर पाटबंधारे अधिकाऱ्यांनी प्रकल्प अहवालानुसार आरक्षित करण्यात आल्याचे नमूद केले. हा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचे सांगून जाधव यांनी गंगापूरमधून कोपरगावला पाणी द्याल तर जलसिंचनच्या वतीने अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. त्यावर जलसंपदामंत्र्यांनी गंगापूरचे पाणी नाशिकला देण्यासह गोदावरी कालव्यास दारणातील शिल्लक पाणी देण्याचे आदेश दिले.
बैठकीस खा. हेमंत गोडसे, खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह अनिल कदम, बाळासाहेब वाजे, योगेश घोलप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, या आमदारांसह विविध लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, महापौर अशोक मुर्तडक, आदी उपस्थित होते.

Story img Loader