सोलापूर : अधिकार नसताना परस्पर बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागातील चार अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सहा परवानाधारक अभियंतेही कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर बेकायदा बांधकाम परवाना प्रकरणातील ९६ पैकी २८ बेकायदा इमारतींचे बांधकाम कोणत्याही नियमात बसत नसल्याने या इमारतींचे पाडकाम करण्याचा प्रस्ताव नगररचना विभाग आणि बांधकाम परवाना विभागाकडून पालिका आयुक्तांना सादर केला जाणार आहे. दरम्यान, संबंधित २८ बेकायदा इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाकडून ऑनलाइन बांधकाम परवाना दिला जातो. परंतु काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन बांधकाम परवाने न देता आणि स्वतःकडे असे बांधकाम परवाने देण्याचा कोणताही अधिकार नसताना परस्पर बांधकाम परवाने दिल्याचे गेल्या वर्षी उजेडात आले होते. याप्रकरणी उपअभियंता झाकीर नाईकवाडी व श्रीकांत खानापुरे यांच्यासह चार अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यापैकी झाकीर नाईकवाडी व श्रीकांत खानापुरे हे अद्याप अटकेत आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असताना महापालिकेतील निवृत्त अभियंते आणि काही परवानाधारक अधिकाऱ्यांनीही काही बेकायदा बांधकाम परवाने दिल्याचे नगररचना कार्यालयाचे म्हणणे आहे. मात्र, त्याची चौकशी रेंगाळली आहे.
दरम्यान, डॉ. सचिन ओंबासे यांनी महापालिकेत आयुक्त तथा प्रशासकपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. यात बांधकाम परवाना विभागातील कारनामे त्यांच्या निदर्शनास आले आहेत. त्यातूनच बेकायदा बांधकाम परवान्यांचे प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे. त्यानुसार एकूण ९६ बेकायदा बांधकाम परवाने दिलेल्या आणि बेकायदा बांधकामे झालेल्या इमारतींची छाननी झाली असता त्यातील २८ इमारती पूर्णतः बेकायदा असून, त्या कोणत्याही परिस्थितीत नियमित करता येऊ शकत नाहीत. अशा २८ बेकायदा इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
बांधकाम करताना वाहनतळाची व्यवस्था न करता येथे बांधकाम करणे, इमारतीसमोरचा भाग मोकळा न सोडता रस्त्यावर पुढे येऊन फ्रंट मार्जिनवर जादा बांधकाम करणे असे प्रकार सर्रासपणे झाले आहेत. मुस्लिम पाच्छा पेठ, तेलंगी पाच्छा पेठ, बेगम पेठ, सिद्धेश्वर पेठ, दक्षिण सदर बाजार, मजरेवाडी, सिव्हिल लाइन्स, गुरुवार पेठ, साखर पेठ, सलगलरवाडी, रेल्वे लाइन आदी भागात ही बेकायदा बांधकामे झाली आहेत. तथापि, शहरात मुरारजी पेठ, नवी पेठ, गोल्डफिंच पेठ, भवानी पेठ, रविवार पेठ व इतर अनेक भागांतही असंख्य बेकायदा बांधकामे झाली आहेत. यात होणारी कारवाई केवळ हिमनगाचा टोक असून, त्यात महापालिका बांधकाम परवाना विभागासह नगर अभियंता आणि नगररचना विभागातील यंत्रणेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.