धाराशिव : नववर्ष म्हणजे पर्यटन, मौजमजा, दंगामस्ती मात्र याबरोबरच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक पर्यटनाचा आलेखही अलीकडच्या काळात वाढताना दिसून येत आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या उत्पन्नात घसघशीत भर पडली आहे. सोमवारी दिवसभरात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने देवीचारणी तब्बल २८ लाखाची रोकड, १८ तोळे सोने आणि दोन किलो चांदी अर्पण केली आहे. दोन दिवसात पन्नास हजाराहून अधिक भाविकांनी जगदंबेचे दर्शन घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुळजाभवानी मंदिरात वर्षभर अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यात शारदीय आणि शाकंभरी नवरात्र महोत्सवासह, गुढीपाडवा, ललितपंचमी, अक्षयतृतीय, रामनवमी, होळी, रंगपंचमी, भेंडोळी अशा महत्वपूर्ण धार्मिक कार्यक्रमांसह अनेक विधी व कुळाचार पार पाडतात. मराठी महिन्याच्या दिनदर्शिकेनुसार या सर्व कार्यक्रमांचे वेळापत्रक मंदिर समितीच्या वतीने जाहीर केले जाते. मात्र अलीकडच्या काही वर्षांपासून नाताळाच्या आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये देवी दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिराचे दरवाजे २२ तास खुले ठेवण्याचा निर्णयही मंदिर संस्थानच्या वतीने घेण्यात आला. दिवसाचे २२ तास मंदिर खुले राहिल्याने भाविकांना दर्शनासाठी मोठा वेळ उपलब्ध झाला. परिणामी दरवर्षी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी येणार्‍या भाविकांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे देवीच्या उत्पन्नातही घसघशीत भर पडत आहे.

आणखी वाचा-“पोलीस हप्ते घेत आहेत आणि गुन्हेगारीकडे…”, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

नववर्षाच्या पूर्वसंध्येला तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी २३ हजार ४१७ भाविक तुळजापुरात दाखल झाले होते तर नववर्षाच्या पहिल्या दिवशी १७ हजार ७९२ भाविकांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. सिंहासन पेटी, देणगी दर्शन, गोंधळ, जावळ, विश्वस्त निधी, अशा वेगवेगळ्या माध्यमातून सोमवारी देवीदर्शनासाठी आलेल्या सुमारे १८ हजार भाविकांनी २८ लाख आठ हजार रूपयांची रोकड देवीचरणी अर्पण केली आहे. मोठ्या श्रध्देने १७९ ग्रॅम ३८० मिली ग्रॅम सोने तर दोन किलो ३३७ ग्रॅम चांदीचे दागिनेही तुळजाभवानी देवीच्या चरणी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अर्पण करण्यात आले आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील भाविक नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. नववर्षाचे स्वागत आणि तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद असा दूग्धशर्करा योग साधत तुळजाभवानी देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या भाविकांनी देवीच्या तिजोरीत मोठ्या श्रध्देने लाखो रूपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचा भक्तीभाव अर्पण केला आहे.

देणगी दर्शनातून साडेनऊ लाख

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना तीन पध्दतीने दर्शन घेता येते. मंदिर संस्थानच्यावतीने व्हीआयपी म्हणजेच अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी सशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त देणगी दर्शन प्रतिभाविक २०० रूपये आकारणी केली जाते. नववर्षाच्या पहिल्या दिवशी ५७ अतिमहत्वाच्या भाविकांनी तर देणगी दर्शनाच्या पासवर तीन हजार ३३९ भाविकांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यातून मंदिर समितीला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नऊ लाख २८ हजार ८०० रूपये एवढे उत्पन्न मिळाले आहे.

आणखी वाचा-यंदा १३२ दिवस उच्च न्यायालयाची दारे बंद, ही आहेत कारणे…

सिंहासन पेटीतून १६ लाख रूपये

तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर मोठ्या समाधानाने भाविक आपापल्या क्षमतेनुसार देवीचरणी रोख रक्कम अर्पण करतात. तर काहीजण मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयात पावती घेवून विश्वस्त निधी श्रद्धेने बहाल करतात. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिंहासन पेटीत तब्बल १६ लाख ४४ हजार ५७० रूपयांची रोकड आढळून आली आहे. तर विश्वस्त निधीच्या माध्यमातून दोन लाख १३ हजार ७४४ रूपये मंदिराच्या उत्पन्नात जमा झाले आहेत. याव्यतिरिक्त फोटो विक्री, मुंज कर, जावळ, सिंहासन श्रीखंड, अशा विविध कुळाचाराच्या माध्यमातूनही मंदिराला पहिल्याच दिवशी भरघोस उत्पन्न मिळाले आहे.