आगामी शैक्षणिक वर्षांत नवीन वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी आणि बी.एस्सी नर्सिग महाविद्यालये सुरू करण्यासाठी २९ प्रस्ताव, तर संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढीसाठी १३, तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एकूण ३४ प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे दाखल झाले आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी त्या बाबत माहिती दिली. विद्यापीठाच्या बृहत आराखडय़ानुसार वैद्यकीय शिक्षणाचे संपूर्ण राज्यात समन्यायी वाटप होण्यासाठी नियोजन केले जात आहे. आरोग्य विद्यापीठ दरवर्षी ३१ ऑक्टोंबरपूर्वी आरोग्य विज्ञानाशी संबंधित नवीन महाविद्यालय सुरू करणे, संलग्नित महाविद्यालयातील प्रवेश क्षमता वाढ, पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणे व प्रवेश क्षमता वाढ करणे याकरिता प्रस्ताव मागवते. त्या अनुषंगाने विविध आरोग्य विज्ञान शाखांचे नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी एकूण २९ प्रस्ताव राज्यभरातून दाखल झाले आहेत. या प्रस्तावांची केंद्रीय विद्यापीठ केंद्रीय परिषदेचे निकष, विद्यापीठाचा बृहत आराखडा या अनुषंगाने छाननी करून ३१ डिसेंबरपूर्वी शासनास शिफारस करेल. त्यानंतर शासनाने आवश्यकता प्रमाणपत्र दिल्यानंतर संबंधित संस्था केंद्र शासनाकडे अर्ज करेल. केंद्र व राज्य शासनाच्या परवानगीनंतर नवीन महाविद्यालय सुरू करण्यास विद्यापीठ अंतिम मान्यता देईल, असे त्यांनी नमूद केले.
नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी दाखल झालेल्या प्रस्तावात पाच प्रस्ताव हे वैद्यकीय शाखेचे आहेत. त्यात पालघर, रायगड व नांदेड (प्रत्येकी १), कोल्हापूर (२) प्रस्तावांचा समावेश आहे. दंत शाखेसाठी सांगली येथून एक प्रस्ताव आहे. आयुर्वेद विद्याशाखेचे एकूण सहा प्रस्ताव असून त्यात बुलढाणा, सांगली, बीड व जालना (प्रत्येकी १), कोल्हापूर (२) तर होमिओपॅथीच्या दोन प्रस्तावात नांदेड व सांगली येथील प्रस्तावांचा समावेश आहे. तत्सम विद्याशाखेतील फिजिओथेरपीसाठी एकूण सहा प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यात सांगली, पुणे, ठाणे, औरंगाबाद, बुलढाणा, गोंदिया, नांदेड, कोल्हापूर, अहमदनगर व नाशिक येथील प्रत्येकी एका प्रस्तावाचा समावेश असल्याचे कुलसचिव डॉ. के. डी. गर्कळ यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा