भंडारदरा-निळवंडे धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवून मराठवाडय़ातील जायकवाडी धरणासाठी देण्यात आलेल्या पाण्याचा कोटा पूर्ण करण्यात आला असून यावेळी ५.४ टीएमसी (६५ टक्के) पाणी जायकवाडीपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. गतवेळच्या तुलनेत यंदा पाणी नुकसानीचे प्रमाण कमी करण्यात यश आल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला असला तरी यावेळचा हा आकडा ३५ टक्के म्हणजे तब्बल ३,३०० दशलक्ष घनफूट इतका आहे.
स्थानिक पातळीवरील विरोध आणि कमीतकमी नुकसान होईल याची दक्षता घेत पाणी जायकवाडीपर्यंत पोहोचविणे, या बाबी लक्षात घेऊन कडेकोट बंदोबस्तात राबविलेली ही प्रक्रिया अखेर पूर्णत्वास गेल्याने पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाचा जीव भांडय़ात पडला. याआधी निळवंडे धरणातून पाणी सोडताना केलेल्या नियोजनाचा अनुभव यंत्रणेला कामी आला. दारणा, निळवंडे-भंडारदरा आणि मुळा धरणातून प्रत्येकी तीन, याप्रमाणे एकूण नऊ टीएमसी पाणी सोडण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. परंतु, काही तांत्रिक कारणास्तव ८.७ टीएमसी पाणी सोडण्यात आल्यावर ही प्रक्रिया थांबविण्यात आली. दारणा धरणातून नऊ दिवस, मुळा धरणातून आठ दिवस हे पाणी सोडले गेले. भंडारदरा-निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सलग १६ दिवस सुरू होती. सोडण्यात आलेल्या एकूण ८.७ टीएमसी पाण्यापैकी जायकवाडीमध्ये ५.४ टीएमसी पाणी पोहोचल्याची नोंद आहे. म्हणजे ३.३ टीएमसी अर्थात ३,३०० दशलक्ष घनफूट पाण्याचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होते. नाशिक-अहमदनगरमार्गे औरंगाबादला पोहोचलेल्या पाण्याला तब्बल १९५ ते २३० किलोमीटरचा प्रवास करावा लागला. भंडारदरा व मुळा नदीपात्र पूर्णपणे कोरडे असल्याने ते पूर्ण क्षमतेने भरण्यात अधिक पाणी लागले. वाळू उपशामुळे नदीपात्रात झालेले खड्डे, विस्तीर्ण पात्र यामुळेही बरेचसे पाणी वाया गेले. यापूर्वी निळवंडे धरणातून पाणी सोडले गेले, तेव्हा एकूण २.५ टीएमसी पैकी केवळ १.१ म्हणजे ४० टक्के पाणी जायकवाडीत पोहोचले होते. तुलनेत यंदा जादा पाणी पोहोचविण्यात यश मिळाल्याचा दावा या विभागाने केला आहे.
स्थानिकांनीही धुतले वाहत्या गंगेत हात
औरंगाबादला पाणी सोडताना दारणा, गोदावरी, मुळा व प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात ते अडविले जाऊ नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या गेल्या असल्या तरी गोदावरी नदीवरील नाशिक आणि नगर जिल्ह्यातील वडगाव कानळद, मंजूर, माहेगाव देशमुख व हिंगणी येथील बंधाऱ्यांमध्ये स्थानिकांनी अतिरिक्त फळ्या टाकून २२१.२५ दशलक्ष घनफूट पाणी अडविल्याचे पुढे आले आहे. या प्रश्नावर नगर जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली होती. जायकवाडीला पाणी सोडताना या बंधाऱ्यांमधील जलसाठा पुन्हा ‘जैसे थे’ करून देण्याचे निश्चित केले असल्याने ही बाब गौण ठरविण्यात आल्याचे दिसत आहे.
जायकवाडीत पोहोचेपर्यंत ३.३ टीएमसी पाणी गेले वाया
भंडारदरा-निळवंडे धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवून मराठवाडय़ातील जायकवाडी धरणासाठी देण्यात आलेल्या पाण्याचा कोटा पूर्ण करण्यात आला असून यावेळी ५.४ टीएमसी (६५ टक्के) पाणी जायकवाडीपर्यंत पोहोचविण्यात आले आहे.
First published on: 15-12-2012 at 02:46 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 3 tmc water waste before reaching at jayakwadi