कुरुंदा (तालुका वसमत) येथील पाणी योजनेच्या जुन्या जलकुंभात मानवी हाडांचे तीन सांगाडे, तर औंढा-नागनाथ तालुक्यातील सिद्धनाथ नदीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे जिल्हय़ात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी गावागावांतून बेपत्ता मंडळींचा शोध सुरू केला आहे.
कुरुंदा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात काही मुले बुधवारी क्रिकेट खेळत होती. त्यांचा चेंडू पाणी योजनेच्या जुन्या जलकुंभात गेला. तो काढण्यासाठी एक मुलगा वर गेला असता त्याला ते सांगाडे दिसून आले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. किमान तीन महिन्यांपूर्वी या जलकुंभात हे मृतदेह टाकले असावेत. एक पुरुष, एक स्त्री व एक मूल असे ते तिघांचे सांगाडे आहेत, असा अंदाज पोलीस उपनिरीक्षक माणिक पेरके यांनी व्यक्त केला. पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी सांगितले, की वापर नसलेल्या जुन्या जलकुंभात चढण्यासाठी शिडी किंवा पायऱ्या नाहीत, त्यामुळे हा प्रकार आत्महत्या की खून याचा शोध सुरू आहे. दरम्यान, औंढा-नागनाथ तालुक्यातील गांगलवाडी येथील सिद्धिनाथ नदीतील पाण्याच्या डबक्यात सुमारे ३० वर्षे वयाच्या पुरुषाचा मृतदेह सापडला. बोरजा येथील राजू महाराजांच्या सोमवार व गुरुवारी भरणाऱ्या दरबारात येणारे भाविक हमखास सिद्धिनाथाच्या दर्शनाला जात. गेल्या सोमवारी महाराजांचा दरबार बंद झाला. नदीतील मृतदेह कुजलेला असल्याने बहुधा गेल्या गुरुवारी दर्शनाला आलेल्या भक्ताचा खून केला असावा किंवा आत्महत्या असावी, याविषयी चर्चा होत आहे.
आईने ओळखला मुलाचा मृतदेह
जलकुंभात सापडलेल्या एका मृतदेहाची ओळख पटली आहे. कुरुंदा येथील २ एप्रिलपासून बेपत्ता झालेल्या साईनाथ पुंजाजी इंगोले (वय २६) याचा हा मृतदेह असून मृतदेहावर पँट-शर्ट होते. कपडय़ावरून साईनाथच्या आईने ही ओळख पटविली. साईनाथ बेपत्ता झाल्याबाबत ६ एप्रिलला कुरुंदा पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. त्यानंतर अशा प्रकारे मुलाचा मृतदेह दिसून येताच या मातेला मोठा धक्का बसला. ओक्साबोक्सी रडताना तिला दातखीळ बसत होती. दु:खावेगातच ती बेशुद्ध पडली. पोलिसांनी हे मानवी सांगाडे अधिक तपासासाठी अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले आहेत. तसेच साईनाथच्या मृतदेहाची खातरजमा करण्यासाठी त्याची हाडे व त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने घेऊन डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा