तारापूर औद्योगिक वसाहतीमधील भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत झालेल्या भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू असून ११ पेक्षा अधिक कामगार जखमी झाले आहेत. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक डी- १७ मधील भगेरीया इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत गामा एसिड उत्पादनाची रासायनिक प्रक्रिया सुरू असताना तापमान वाढल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. गोपाल गुलजारीलाल सिशोदिया (३५), पंकज यादव (३२), सिकंदर (२७) अशी मृत कामगारांची नावे आहेत.
हेही वाचा- राज्यात ९३ हजार पशुधन लम्पी रोगमुक्त
गामा ऍसिड उत्पादनाची रासायनिक प्रकिया सुरू असताना संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास रिॲक्टरचा जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की लगतच्या सालवड गावात भूकंप झाल्याप्रमाणे कंप जाणवला. या अपघातामध्ये तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर ११ पेक्षा अधिक कामगार भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना उपचारासाठी बोईसर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काही कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात प्रभावित झालेले कामगार हे ठेका पद्धतीवर काम करणारे असल्याने त्यांची ओळख पटवण्याचे पोलिसांकडून सुरू आहे.