मतदानात दहा टक्क्यांनी वाढ; २.१५ लाख मतदार वसई, नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघांतून
पालघर : मे २०१८ मध्ये झालेल्या पालघर पोटनिवडणुकीच्या तुलनेत सुमारे दहा टक्के मतदान वाढल्याने तीन लाख १४ हजार अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही बाब सध्या बहुजन विकास आघाडी, तसेच शिवसेनेच्या नेत्यांसाठी चिंतेचे कारण बनले आहे. यापैकी २.१५ लाख मतदार वसई, नालासोपारा आणि बोईसर या मतदारसंघांत वाढले आहेत.
२९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता मतदान करण्याची वेळ संपली तरी अनेक केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. बोईसर मतदारसंघात शेवटचे मत टाकण्यास रात्रीचे साडेदहा वाजले. यामुळे मतदानाची आकडेवारी रात्रभर संकलित करून ती मंगळवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात आली.
पालघर लोकसभा मतदारसंघात ६३.७२ टक्के मतदान झाले असून डहाणू ६७.१३ टक्के, विक्रमगड ६९.५० टक्के, पालघरमध्ये ६८.५७ टक्के, बोईसर ६८.४९ टक्के, नालासोपारा ५२.१६ टक्के आणि वसईत ६५.२४ टक्के मतदान झाले. मतदानाच्या दिवसाच्या काही दिवस आधी निवडणुकीसाठी उत्साहवर्धक वातावरण दिसून येत नव्हते. याशिवाय काही दिवसांपासून प्रचंड उकाडय़ामुळे टक्केवारी घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत चार प्रमुख पक्ष असताना जेमतेम ५३ टक्के मतदान झाले होते.
वाढलेल्या मतदानामध्ये नालासोपारा येथे एक लाख चार हजार, वसईमध्ये ५९ हजार व बोईसरमध्ये ५२ हजार असे सुमारे दोन लाख १४ हजार मतदार आहेत. याच तीन मतदार विधासभा क्षेत्रात गेल्या वर्षभरात दीड लाख मतदार वाढले होते. पालघरमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ४१ हजार, डहाणूमध्ये ३२ हजार, तर विक्रमगडमध्ये २६ हजार मतदान अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून आले आहे.
२०१४ नंतर या मतदारसंघात सुमारे तीन लाख नऊ हजार नव्याने नोंदविण्यात आलेले मतदार होते. त्यापैकी अधिकतर मतदारांनी हक्क बजावल्याचे सांगण्यात येते. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात प्रमुख राजकीय पक्षाने त्यांच्या प्रभावक्षेत्रात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी नेत्यांनी हात सैल केल्याने मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसल्याचे राजकीय मंडळींचे म्हणणे आहे.
नालासोपारा येथे यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये ४० टक्के मतदान झाले होते. यंदा त्याहून अधिक मतदान झाले आहे. जानेवारी २०१९ पासून या भागात सुमारे २५ हजार नवीन मतदारांची नोंद झाली असताना हे नवीन मतदार नेमके कोण नोंदवत आहेत? त्यांची पडताळणी योग्य पद्धतीने केली जात आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने डहाणू आणि विक्रमगड या दोन मतदारसंघांत जोमाने काम केल्याने या दोन मतदारसंघांत टक्केवारी वाढल्याचे बोलले जाते. एकीकडे विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील अनेक मतदार स्थलांतरित झाले असताना त्या ठिकाणचे मतदान साडेसात टक्क्यांनी वाढले आहे. पोटनिवडणुकीत वनगा कुटुंबीयांविषयी सहानुभूती असताना ५९ टक्के मतदान झाले होते, यंदा ते वाढून ६७ टक्कय़ांपर्यंत गेल्याने त्या विधानसभा क्षेत्रातील समीकरणे बदलणार आहेत. अंतर्गत मतभेद विसरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी युतीच्या उमेदवारासाठी जोर लावल्याने त्याची प्रचीती नालासोपारा, बोईसर, विक्रमगड व डहाणू या मतदारसंघांत दिसून आली असल्याचे बोलले जाते. शिवसेनेतील नेते ठाणे व कल्याणऐवजी पालघरकडे लक्ष ठेवून होते, तसेच अनेक दिवस या मतदारसंघात ठाण मांडून बसल्याने त्याचा लाभ सेनेच्या उमेदवाराला झाल्याचा तर्क मांडला जात आहे.
पालघर मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी
विधानसभा क्षेत्र पुरुष महिला इतर एकूण प्रत्यक्ष मतदान टक्के
१२८ डहाणू १,३६१०६ १३३८७४ ०८ २६९९८८ १८१२५२ ६७.१३
१२९ विक्रमगड १३३७५३ १३०३७९ ०० २६४१३२ १८३५८४ ६९.५०
१३० पालघर १३७८३८ १३३३१३ १६ २७११६७ १८५९४३ ६८.५७
१३१ बोईसर १६०७९९ १३७०९२ २४ २९७९१५ २०४०४९ ६८.४९
१३२ नालासोपारा २६८६९७ २१८८०७ ५६ ४८७५६० २५४३१३ ५२.१६
१३३ वसई १५१८०४ १४२७२४ ०७ २९४५३५ १९२१५७ ६५.२४
एकूण ९८८९९७ ८९६१८९ १११ १८८५२९७ १२०१२९८ ६३.७२