लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी हातकणंगले मतदारसंघात मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांच्यासह दोघा उमेदवारांचे तीन अर्ज दाखल झाले. तर बुधवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून एकही अर्ज दाखल झाला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे गुरुवारी अर्ज दाखल करणार आहेत.    
लोकसभा निवडणुकीची अधिसूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजाराम माने (कोल्हापूर) व अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार (हातकणंगले) यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार बुधवारपासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या दिवशी कोल्हापूर मतदारसंघात एकही अर्ज दाखल झाला नाही. तर हातकणंगलेतून मात्र दोन उमेदवारी अर्ज अजित पवार यांच्याकडे दाखल करण्यात आले.
सुरेश पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. दसरा चौक येथून बैलगाडीतून ते मिरवणुकीने अर्ज दाखल करण्यासाठी निघाले. पारंपरिक वाद्याच्या निनादात मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आली. तेथे आचारसंहितेमुळे केवळ पाच जणांना आत प्रवेश देण्यात आला. पाटील यांनी जय जनसेवा आघाडी व अपक्ष अशा दोन प्रकारचे अर्ज दाखल केले. तर डमी म्हणून युवराज सुरेश पाटील (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केला. पाटील यांनी कपबशी, पतंग व नारळ या चिन्हांना पसंती दर्शविली आहे. अर्ज दाखल करताना इचलकरंजीचे माजी नगराध्यक्ष राजाराम धारवट, संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष राजू सावंत, प्रा. मधुकर पाटील, भरत पाटील, बहुजन दलित महासंघाचे बाळासाहेब महापुरे, जय जनसेवा पक्षाचे संस्थापक आबा जावळे, संतोष कांदेकर उपस्थित होते.    
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी शेट्टी व आवाडे या प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीकेची झोड उठविली. खासदार शेट्टी यांनी उसाच्या आंदोलनातून स्वार्थी राजकारण केले, असा आरोप करण्यात आला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाढत्या भ्रष्टाचारामुळे काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे पराभूत होतील, असेही ते म्हणाले.