शोधासाठी कोंबिंग ऑपरेशन, ५० कॅमेरा ट्रॅप, श्वान पथकही
नऊ महिन्यापूर्वी चार बछडय़ांना मृतावस्थेत सोडून निघून गेलेल्या वाघिणीचा शोध घेण्यात वनविकास महामंडळ (एफडीसीएम) अपयशी ठरलेले असतांनाच तळोधी बाळापूरच्या जंगलात रविवारी मृतावस्थेत सापडलेल्या वाघिणीचे आठ महिने वयाचे तीन बछडे दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने वनखाते हादरले आहे. दरम्यान, त्यांच्या शोधासाठी कोबिंग ऑपरेशन राबविले जात असून ५० कॅमेरा ट्रॅप व श्वान पथकालाही पाचारण केल्याची माहिती आहे. या दोन घटनांवरून वनखाते बछडे व वाघिणीचे ‘मॉनिटरिंग’ करण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे.
नागभीड तालुक्यात एफडीसीएमच्या तळोधी बाळापूरच्या जंगलातील कक्ष क्रमांक ७३ मध्ये रविवारी वाघीण मृतावस्थेत सापडली. तिच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही, असे ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांचे मत आहे. मात्र, तिचा व्हिसेरा व केस हैदराबादच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे एफडीसीएमचे अधिकारी अस्वस्थ असतांनाच या वाघिणीला आठ महिने वयाचे तीन बछडे असल्याचे समोर आल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कारण, त्यांनी ही माहिती प्रसार माध्यमापासून एक दिवस लपवून ठेवली होती. आता सर्वस्तरातून विचारणा होत असतांनाच एफडीसीएमचे मुख्य महाव्यवस्थापक सुधाकर डोळे यांनी काही पत्रकारांशी बोलतांना या वाघिणीला ३ बछडे होते, हे मान्य केले. मात्र, ते घटनास्थळी किंवा आजूबाजूला न दिसल्याने ते गेले कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या बछडय़ांच्या शोधासाठी कोबिंग ऑपरेशन सुरू केले आहे. एफडीसीएमचे मुख्य व्यवस्थापक राजपूत, वनाधिकारी बिराडे, वनपरिक्षेत्र अधिकारी रायपुरे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे पथक त्यांचा शोध घेत आहेत.
सोमवारी दिवसभर शोधल्यावरही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. विशेष म्हणजे, घटनास्थळी ५० कॅमेरा ट्रॅप लावण्यात आल्याची माहिती सुधाकर डोळे यांनी दिली, तसेच तळोधीला ब्रम्हपुरी वन विभागाचे क्षेत्र लागून असल्याने त्यांचीही मदत घेण्यात आली आहे.
या विभागानेच कॅमेरा ट्रॅप लावण्याची माहिती त्यांना दिली. यासाठी श्वान पथकही बोलवण्यात आल्याची माहिती एफडीसीएमच्या सूत्राकडून मिळाली. दरम्यान, एफडीसीएमचे अधिकारी मात्र यावर काहीही बोलायला तयार नाही. विशेष म्हणजे, ९ महिन्यांपूर्वी २७ डिसेंबरला पाथरी येथे एफडीसीएमच्याच जंगलात एक वाघीण ४ बछडय़ांना सोडून बेपत्ता झाली होती. त्यानंतर या चौघांचाही मृत्यू झाला होता. तेव्हापासून हे अधिकारी वाघिणीचा शोध घेत आहेत. यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री भगवान यांनी या वाघिणीचे सातत्याने मॉनिटरिंग करण्याचे निर्देश देऊनही एफडीसीएमचे याकडे दुर्लक्ष झाल्याने आता पुन्हा तीन बछडय़ांची वाघीण गमवावी लागली आणि बछडेही बेपत्ता झाल्याने हे प्रकरण संशयास्पद असल्याचे सांगण्यात येत आहे.
व्याघ्र अभ्यासक पाठविण्याची विनंती
वाघिणीच्या मृत्यूनंतर ३ बछडे बेपत्ता झाल्याची समोर येताच एफडीसीएमचे मुख्य महाव्यवस्थापक सुधाकर डोळे यांनी वाईल्ड लाईफ इेस्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या संचालकांना पत्र लिहून तात्काळ संशोधकाची नियुक्ती करण्याची विनंती केली आहे. बछडय़ांच्या शोधासाठी एका व्याघ्र अभ्यासकाची आवश्यकता आहे, त्यामुळे वाईल्ड लाईफ इंस्टिटय़ूटने त्याची नियुक्ती करून त्याला तातडीने तळोधीत पाठवावे, असेही या पत्रात नमूद केले असल्याची माहिती डोळे यांनी दिली.