तालुक्याच्या पश्चिम भागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. सातत्याने पडत असलेल्या पावसाने भंडारदरा धरणातील पाणीसाठय़ाने ३ टीएमसी तर मुळा धरणाच्या पाणीसाठय़ाने ७ टीएमसीचा टप्पा पार केला. मुळा धरणाच्या पाणलोटातील बलठण लघुपाटबंधारे तलाव आज भरून वाहू लागला. नगर शहर व जिल्ह्य़ाच्या ब-याचशा भागात बुधवारी पहाटेपासूनच भुरभुर सुरू आहे, मात्र या पावसाला जोर नाही.
भंडारदरा धरणातील पाणीसाठा बुधवारी सायंकाळी ३ हजार ३७ दशलक्ष घनफूट व मुळा धरणातील पाणीसाठा ७ हजार १०० दशलक्ष घनफूट झाला आहे. आठवडय़ाआपेक्षा अधिक काळ पश्चिम भागात पाऊस सातत्य टिकवून आहे. हरिश्चंद्रगडावरील पावसाने या भागातील आंबित, कोथळे, देवहंडी व आता बलठण हे चारही तलाव भरून वाहू लागले आहेत. २०५ दशलक्ष घनफूट क्षमतेचा बलठण तलाव आज पहाटे तुडुंब झाला. तलाव बंधारे, छोटे, मोठे तलाव, ओढे-नाले वाहत असल्याने मुळा नदीची पातळी टिकून आहे. कोतुळजवळ मुळा नदीचा विसर्ग सायंकाळी ३ हजार ८१२ क्युसेक होता. भंडारदरा धरणाच्या पाणीसाठय़ात २४ तासांत २३८ दशलक्ष घनफुटांची भर पडली. सायंकाळी हा साठा ३ हजार ३७ दशलक्ष घनफूट झाला होता. निळवंडे धरणाच्या पाणीसाठय़ातही ७४ दशलक्ष घनफुटाने वाढ होऊन ५८८ दशलक्ष घनफूट झाला होता. वातावरणात मोठय़ा प्रमाणात घट झाल्याने संपूर्ण तालुका गारठून गेला आहे. पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी जोरदार वारे व बोचरा गारठा यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे.
नगरकरांना दिलासा
मुळा धरणात सुरू असलेली आवक आणि आत्तापर्यंत आलेले नवीन पाणी लक्षात घेता, नगर शहरासह राहुरी, नेवासे, शेवगाव तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्त मिटला आहे. आठ दिवसांपर्यंत धरणातील पाणीसाठय़ाने तळ गाठला होता. पाणलोट क्षेत्रातील सततच्या पावसाने या आठ दिवसांत मात्र धरणात सुमारे दोन टीएमसीपेक्षा अधिक नव्या पाण्याची आवक झाली. त्यामुळे नगरकरांना दिलासा मिळाला आहे.

Story img Loader