मान्सूनचे सर्वत्र आगमन झाले असले तरी कृष्णा, कोयना नद्यांकाठी मात्र मान्सूनसदृश्य वातावरण राहताना पावसाची दडी कायम आहे. कोयना धरणक्षेत्रात पावसाच्या हलक्याच सरी कोसळत आहेत. कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर नसल्याने १ जूनपासूनच्या चालू तांत्रिक वर्षांतील प्रारंभीच्या पंधरवडय़ात धरणाच्या पाणीसाठय़ात सुमारे तीन टीएमसीची घट झाली आहे.
मान्सूनचे ७ जूनच्या मुहूर्तापूर्वीच आगमन होईल अशी वर्तवण्यात आलेली शक्यता फोल ठरताना, आजअखेर मान्सूनचे आगमनच झालेले नाही. ढगाळ वातावरण पावसाची चाहूल देत असले तरी मान्सूचे बरसणे खोळंबलेलेच आहे. त्यामुळे मान्सूनचा हा रूसवा सध्या बळीराजासह सामान्यजनांच्या चर्चेत आहे. मशागतीच्या कामात व्यस्त राहणारा शेतकरीवर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने दुष्काळी माण, खटाव, फलटण, खंडाळा तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या सर्वच विभागात हजेरी लावली. त्यात वरील चारही तालुक्यांना काहीसा दिलासा दिला. दुष्काळी पट्टय़ातील हा पाऊस सरासरी ७० मि. मी. च्या घरात आहे. पण, पावसाची ही सरासरी सातारा जिल्ह्यात इतरत्र दिसून येत नाही.
कोयना धरण क्षेत्रात आज दिवसभरात ११.३३ एकूण ८६ मि. मी. पाऊस होताना, धरणाची जलपातळी २,०७६.६ फूट असून, तुलनेत समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणक्षेत्रातील कोयनानगर येथे १ एकूण ३४, नवजा २० एकूण ११४, महाबळेश्वर १३ एकूण ११९ तर पाथरपुंज येथे २१ एकूण १९९ मि. मी. पावसाची नोंद आहे.

Story img Loader