दुप्पट पैशांचे आमिष दाखवून कोटय़वधी रुपयांची फसवणूक केलेल्या उल्हास खरे याच्या बंगल्याच्या पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये आज ३० कोटी रुपयांचे डिमांड ड्राफ्ट जप्त केले.  देशभरातील दोन लाखांपेक्षा जास्त ग्राहकांकडून सुमारे ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम लुबाडल्याच्या संशयावरून गेल्या ७ नोव्हेंबर रोजी खरे व त्याची पत्नी रक्षा यांना दिल्लीच्या पोलिसांनी येथे अटक केली आणि पुढील तपासासाठी दिल्लीत नेले. तेथे काही दिवस तपास केल्यानंतर गेले तीन दिवस खरे याला येथे आणून त्याच्या आलिशान बंगल्याची झडती घेण्यात आली. त्यामध्ये त्याने येथील विविध बँकांमध्ये ४५ खाती स्वत: आणि पत्नीच्या नावाने काढल्याचे निष्पन्न झाले असून, ही सर्व खाती पोलिसांनी काल गोठवली. त्यानंतर आज दिवसभर घेतलेल्या झडतीत खरेकडे ३० कोटी रुपयांचे डिमांड ड्राफ्ट पोलिसांना मिळाले. ते जप्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विविध बँकांची ५० क्रेडिट-डेबिट कार्डे आणि मोबाइल कंपन्यांची सिमकार्ड, तसेच १६ पॅनकार्ड मिळाली आहेत.
याव्यतिरिक्त खरे याच्या बंगल्यातून काही मौल्यवान वस्तू आणि दागिने पोलिसांनी जप्त केल्याचे समजते. त्यानंतर येथील तपास पूर्ण करून संध्याकाळी पोलीस खरेसह गोव्याकडे रवाना झाले. तेथेही त्याचा बंगला असून आणखी मालमत्तेबाबत तपास करण्यात येणार आहे.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 30 caror demand draft got from cheater khare