Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. पहिल्या दिवशी १ कोटी ७ लाख महिलांना हा लाभ मिळाला तर दुसऱ्या दिवशी १ कोटी २५ लाख महिलांना लाभ मिळाला. दरम्यान, या योजनेतील ३० लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त काही ठिकाणी छापून आले आहे. मात्र, या अपप्रचारावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. त्या रायगड येथे टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.
३० लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर आहेत, याबाबत आदिती तटकरे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, मला माहीत नाही हा आकडा कुठून येतो. पण माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की अशा कोणत्याही बातम्या आणि अफवांना बळी पडू नका. २ कोटी ४१ लाख महिलांच्या खात्यात लाभ थेट हस्तांतरण करण्यात आलं आहे.”
अपप्रचारा बळी पडू नका
“पहिल्या दिवशी १ कोटी ७ लाख महिलांना लाभ दिला तर काल सुद्धा १ कोटी २५ लाख महिलांना लाभ वितरित झाला आहे. लाभार्थ्यांचं वितरण नेहमीप्रमाणेच सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये ९ तारखेला २ कोटी ३४ लाख महिलांना लाभ दिला होता. आता लाभ वितरण २ कोटी ४१ लाख महिलांना झालेला आहे. कोणत्याही अफवांना आणि अपप्रचारांना बळी पडू नये”, असं आदिती तटकरे म्हणाल्या.
सातवा हप्ता येण्यास सुरुवात
जुलै २०२४ च्या पावसाळी अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार, अटी शर्थींच्या आधारे सरकारने महिलांकडून अर्ज भरून घेतले अन् पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत सहा हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत, तर जानेवारीचा सातवा हप्ताही पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.