नुकत्याच संपलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये  विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात निदर्शने- घोषणाबाजी करताना पुढाकार घेणारे राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक इशारा देताना करुणा या शब्दाचा वापर केल्याचं पहायला मिळालं. मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा मुंडे यांनी या विधानानंतर मुख्यमंत्री शिंदेंची भेटही घेतली होती. याच करुणा यांची अहमदनगरमध्ये तब्बल ३० लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करुणा मुंडे यांची संगमनेरमध्ये ३० लाखांची फसवणुक झाली आहे. या प्रकरणामध्ये संगमनेर शहर पोलीस स्थानकामध्ये एका बांधकाम व्यवसायिकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवा पक्ष काढण्यास आर्थिक मदत करतो असं सांगून करुणा यांना गुंतवणूक करण्यासाठी या व्यवसायिकाने प्रवृत्त केलं. करुणा मुंडे यांना राजकीय पक्ष काढण्याचं अमीष दाखविण्यात आले होते. या प्रकरणामध्ये भारत भोसलेसह तीनही आरोपी संगमनेर तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

राहुल मदने डीव्हायएसपी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, राजकीय पक्ष काढण्याचं अमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितलं. या गुंतवणुकीवर वेळोवेळी पैसे मिळत राहतील असा दावा करणारे काही कागदपत्रंही करुणा यांना आरोपींनी दिले. २० लाखांची रक्कम ही थेट खात्यावरुन पाठवण्यात आली होती. तर उर्वरीत रक्कम म्हणजेच ९ लाख ५० हजारांचे गहाणखत तयार करुन घेत ही फसवणूक करण्यात आली. मात्र नंतर या गुंतवणुकीवर कोणतेही पैसे आरोपींनी परत केले नाहीत. वारंवार विचारणा केल्यानंतरही कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळेच करुणा यांनी पोलीस स्थानकामध्ये धाव घेत आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

करुणा मुंडे यांनी आपण धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा केला होता. यानंतर मोठा राजकीय वादही निर्माण झाला होता. याच करुणा यांचा उल्लेख करत मुख्यमंत्री शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात धनंजय मुंडेंना टोलाही लगावला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 30 lakh rs fraud with karuna munde in sangamner rno news scsg