सहकारात शिरलेले राजकारणच सहकार चळवळीला मारक ठरत असून नि:स्वार्थी भावनेने काम करणा-या कार्यकर्त्यांचा अभावामुळेच सहकाराची अधोगतीकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन लोकसत्ताचे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी बुधवारी केले. स्व. गुलाबराव पाटील यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त संगोराम यांचे ‘सहकार की राजकारण’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
गुलाबराव मेमोरियल ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील हे होते. या वेळी जयराम देसाई, उदयसिंह देशमुख उपस्थित होते.
संगोराम म्हणाले, की सहकारात झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते होते. ते सामान्य माणसाला मिळणा-या सुखाचा आनंद शोधत होते. यामुळेच सहकाराला विकासात अनन्य साधारण महत्त्व आहे. वसंतदादा, गुलाबराव पाटील यांच्यासारख्या समाजातील तळागाळापर्यंत मदत करणा-या लोकांनी सहकार चळवळीला दिशा दिली. आजच्या घडीला महाराष्ट्रात सुमारे एक लाख सहकारी संस्था कार्यरत आहेत. भविष्यात शेतीची विभागणी वाढत गेल्याने सहकाराशिवाय पर्याय राहणार नाही.
सहकारातून संस्था उभ्या करायच्या आणि त्यातून राजकारण साधायचे या प्रवृत्तीमुळे सहकार चळवळ अधोगतीला लागली असून समाजाच्या प्रगतीसाठी ही दिशा मारक ठरणारी आहे. सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारी उभी राहिली. मात्र या साखर उद्योगामुळे पाण्याचा अपव्यय मोठय़ा प्रमाणात होऊ लागला. आजच्या घडीला एक चमचा साखर तयार करण्यासाठी ३० लीटर पाण्याची गरज भासते. दुष्काळामुळे एकीकडे पिण्यास पाणी मिळत नाही तर दुसरीकडे या पद्धतीने होत असलेली पाण्याची चैन परवडणार आहे का?
सहकारात चारित्र्यसंपन्न माणसे आली, तरच या चळवळीचा लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचणार आहे. केवळ राजकारणासाठी सहकार न वापरता समाजकारणासाठी ही चळवळ उपयोगात आणली पाहिजे, असेही संगोराम यांनी सांगितले.
या वेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, की महाविद्यालयीन जीवनापासून राजकीय क्षेत्रात मी कार्यरत असून गुलाबराव पाटील यांच्यासारखे लोक मार्गदर्शक होते म्हणून राजारामबापूंसारखा वस्त्रोद्योग उभा करू शकलो. वाळव्यापासून सांगलीला पोहोचेपर्यंत आयुष्याची ४० वर्षे गेली. मात्र संस्था चांगली चालली पाहिजे ही आपली भूमिका असून सामान्य माणसाच्या हितासाठीच सहकार चळवळ राबविली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
एक चमचा साखर तयार करण्यासाठी ३० लीटर पाण्याची गरज भासते
सहकारात शिरलेले राजकारणच सहकार चळवळीला मारक ठरत असून नि:स्वार्थी भावनेने काम करणा-या कार्यकर्त्यांच्या अभावामुळेच सहकाराची अधोगतीकडे वाटचाल
Written by अपर्णा देगावकर
First published on: 17-09-2015 at 03:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 30 liters of water need to build a spoon of sugar