महिनाभात आरोग्य विभागात जवळपास ३० हजार रिक्त जागा भरणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता हा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग तसंच राज्यभरातील विविध महापालिका रुग्णालयांमध्ये जवळपास 30 हजार जागा रिक्त आहेत. या सर्व जागा महिना ते दीड महिन्यात भरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील BKC आयसोलेशन सेंटर व वरळी येथील NSCI Dome या दोन्ही कोविड केअर सेंटरला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे उपस्थित होत्या. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी लवकर आरोग्य विभागातील सर्व रिक्त जागा भरणार असल्याची माहिती दिली.
आणखी वाचा- राज्यातून १९१ ट्रेनद्वारे अडीच लाख परप्रांतीय कामगारांना पाठवलं स्वगृही – अनिल देशमुख
मुंबई महापालिकेने तातडीने रिक्त जागा भरण्यास सुरुवात केली असून राज्यातील इतर ठिकाणी असणाऱ्या जागाही तात्काळ भरण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागात १७ हजार ३३७ जागा रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागात ११ हजार जागा रिक्त आहेत. राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. महिनाभरात या सर्व जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी वेगळा विभाग तयार केला जात आहे. परीक्षा न घेता त्यांच्या जुन्या ज्या परीक्षा असतील जसे नर्सिंग कॉऊन्सिल, MBBS ची झालेली परीक्षा, पीजीचे मार्क असतील या आधारावर या जागा भरल्या जाणार आहेत, असेही राजेश टोपे म्हणाले.