हिंगोली : मोठ्या भावाचे लग्न झाले, धाकट्या चुलत भावाचेही जुळून आले. मात्र, आपले लग्न जुळून येत नसल्याची सतावणारी सततची चिंता आणि त्यातही कामकाज शेतीत असल्याने स्थळं येत नसल्याच्या नैराश्येतून एका ३० वर्षीय तरुणाने सोमवारी दुपारी मरणाला कवटाळले. कळमनुरी शहराजवळील दैवदरी शिवारातील ही घटना त्याच दिवशी रात्री समोर आली. गजानन बंडूअप्पा व्यवहारे, असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव असून, तो कळमनुरी शहरातील तांबोळी गल्लीतला रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गजानन बंडुअप्पा व्यवहारे (३०) हा तरूण आपल्या माता पित्यासह राहतो. त्याला एक मोठा भाऊ आहे. गजाननचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. गजाननच्या मोठ्या भावाचे लग्न झाले होते. तर वयाने लहान असलेल्या चुलत भावाचे लग्न जमले आहे. गजाननचा विवाह करण्याकरीता त्याच्या आई वडिलांनी काही ठिकाणी स्थळं पाहिली होती. मात्र विवाहाचा योग जुळून येत नव्हता. लहान असून चुलत भावाच्या विवाहाचा योग जमला मात्र, आपला विवाह होत नसल्याने गजानन हा गेल्या काही दिवसापासून चिंतेत होता. लग्नासाठी मुलगी पहा असे आई वडिलांना तो वारंवार म्हणत होता. परंतु विवाह योग जुळून येत नसल्याची चिंता त्याला सतावत होती, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले.

आपले लग्न काही होत नाही याची खूणगाठ बांधून २४ फेब्रुवारी रोजी गजानन नेहमी प्रमाणे आपल्या घरातून बाहेर पडला व थेट देवदरी शिवारातील शेतामध्ये गेल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. नजीकच्या शेतकऱ्यांनी गजाननचा मृतदेह झाडाला लटकलेला पाहून नातेवाईकांना आणि पोलिसांना कळवले. कळमनुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन गजाननचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात हलवला. याप्रकरणी खंडु लिंगाआप्पा व्यवहारे यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.मोठ्या भावाचे लग्न झाले. लहान असूनही चुलत भावाची सोयरीक जुळली. माझे लग्न का होत नाही ? अशी चिंता आणि आपले लग्न होऊ शकत नाही या भावनेतून गजाननने आत्महत्या केली.

Story img Loader