कोकणासह देशातील आंबा पिकवणाऱ्या राज्यांमधून विविध जातींच्या आंब्यांची विक्रमी निर्यात यंदा सुमारे तीनशे टनांवर जाण्याची चिन्हे आहेत, पण एकूण आंबा उत्पादनाच्या तुलनेत हे प्रमाण नगण्यच मानले जाते.गेल्या काही वर्षांत केशर, गोवा मान्कुर, राजापुरी, लंगडा इत्यादी जातींच्या आंब्यांनी हापूसला कडवी स्पर्धा निर्माण केली आहे. या आंब्यांच्या निर्यातीसाठी राज्याच्या कृषी खात्याचे पणन मंडळ प्रयत्नशील आहे. कोकणाबरोबरच गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, इत्यादी राज्यांमधील हा आंबा मंडळातर्फे प्रक्रिया करून परदेशी पाठवला जातो. गेल्या वर्षी अशा प्रकारे एकूण सुमारे २०० टन आंबा निर्यात करण्यात आला. यंदा हा आकडा मे अखेर २२५ टनांपर्यंत पोचला असून या महिन्यात केशरची मोठय़ा प्रमाणात निर्यात होण्याची अपेक्षा पणन मंडळाचे निर्यात व्यवस्थापक मिलिंद जोशी बाळगून आहेत. तसे झाल्यास यंदा एकूण निर्यात ३०० टनांवर जाईल, अशी चिन्हे आहेत. मात्र यामध्ये हापूस आंब्याचे प्रमाण जेमतेम ५० टन आहे. रत्नागिरीच्या आंबा निर्यात सुविधा केंद्रामार्फत यंदा अमेरिकेला सुमारे ३० टन तर न्यूझीलंडला २० टन आंबा पाठवण्यात आला. राज्य पणन महामंडळातर्फे आंब्याची निर्यात २००७ सालापासून सुरू झाली. त्या वर्षी येथून ४१ टन आंब्याची निर्यात झाली.
आंब्याचे उत्पादन आणि निर्यातीमध्येही अशाच प्रकारचे लाभदायी चित्र यंदा दिसून येत आहे. मात्र एकूण आंबा उत्पादनाच्या तुलनेत हे प्रमाण अतिशय नगण्य मानले जाते. राज्य शासनाच्या आंबा प्रक्रिया केंद्रांवर सुविधा, स्वच्छतेचा अभाव, तसेच परदेश प्रवासात आंब्याचा दर्जा टिकून राहण्यासाठी आवश्यक संशोधनाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे इतक्या कमी निर्यातीवरही समाधान मानण्याची वेळ आल्याचे मत प्रमुख आंबा निर्यातदारांनी व्यक्त केले. दरम्यान, कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम आता संपला आहे. यंदाच्या वर्षी चांगल्या उत्पादनामुळे स्थानिक बाजारपेठेत हा हंगाम दीर्घ काळ चालू राहिला. बागायतदारांना त्याचा चांगला लाभ झाला. पण गेल्या महिन्यात पुण्या-मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा फटका आंबा बागायतदारांनाही बसला. पुण्यात आंबा विक्रीसाठी दुकान उघडे ठेवूनही संपामुळे ग्राहक फिरकले नाहीत, अशी खंत येथील प्रमुख आंबा बागायतदार डॉ. विवेक भिडे यांनी व्यक्त केली.
आंब्याची निर्यात तीनशे टनांवर?
कोकणासह देशातील आंबा पिकवणाऱ्या राज्यांमधून विविध जातींच्या आंब्यांची विक्रमी निर्यात यंदा सुमारे तीनशे टनांवर जाण्याची चिन्हे आहेत, पण एकूण आंबा उत्पादनाच्या तुलनेत हे प्रमाण नगण्यच मानले जाते.गेल्या काही वर्षांत केशर, गोवा मान्कुर, राजापुरी, लंगडा इत्यादी जातींच्या आंब्यांनी हापूसला कडवी स्पर्धा निर्माण केली आहे.
First published on: 06-06-2013 at 02:38 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 300 tons mango export this year