अलिबाग-  पंतप्रधान सुर्यघर योजनेला रायगड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात सौर उर्जेतून ३ हजार ३३५ किलो वॅट वीज निर्मिती होत आहे.  ९८० लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून २ हजार ग्राहकांनी योजनेसाठी अर्ज सादर केले आहेत. महत्वाची बाब म्हणजे महावितरणच्या भांडुप परिमंडळ विभागात रायगडचा पेण विभाग अव्वल आहे. 

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या कल्याण आणि भांडुप परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत १३ हजार ८३१ जणांनी अर्ज केले आहेत. यातील २ हजार ४४८ ग्राहकांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित अर्जदारांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याची प्रक्रिया सुरु आहे.

भांडूप परिमंडळ विभागात येणाऱ्या ठाणे शहर, वाशी आणि पेण या तीन विभागात रायगडचा पेण विभाग अव्वल आहे. ठाणे शहरात २ हजार ५८७, वाशी विभागात २ हजार ४८४ तर पेण विभागात सर्वाधिक ३ हजार ३६५ किलोवॅट वीज निर्मिती होत आहे.

वीजेचे वाढणारे दर आणि त्यामुळे मासिक वीज बिलात होणारी वाढ ही ग्राहकांसाठी कायमच चिंतेची बाब राहीली आहे. मात्र वाढत्या वीज बिलांपासून सौर उर्जा निर्मितीतून सुटका करणे शक्य झाले आहे. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत पर्यावरणपूरक वीज निर्मितीसोबतच आपल्या मासिक वीजबिलात बचत करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. वाढत्या वीज बिलांपासून सुटका होण्यास या योजनेमुळे मदत होत आहे.

या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. सौर प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. तर शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३० हजार रुपये अनुदान २ किलोवॅटपर्यंत मिळते. ३ किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते. ३ किलोवॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे. गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरीता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी १८ हजार रुपये प्रति किलोवॅट अनुदान मिळते. गृहसंकुलासाठी अनुदानाची एकूण कमाल मर्यादा ५०० किलोवॅट आहे.

महावितरणतर्फे रुफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर मोफत देण्यात येत आहे. ग्राहक आणि सोलर रूफटॉप बसवणाऱ्या एजन्सींसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे. त्याचप्रमाणे १० किलोवॅटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते.

भांडूप परीमंडळात सौर वीज निर्मितीत रायगड पेण विभाग अव्वल

 बिभाग             प्राप्त अर्ज  बसवलेले ग्राहक   वीज निर्मिती (कि.वॅ)

ठाणे शहर मंडल        ३९४          ८९                 २५८७

वाशी मंडल            १५५०         ३९८                २४८४

पेण मंडल             २८१७          ९८०                ३३६५

एकूण परिमंडल       ४७६१        १४६७                ८४३६

Story img Loader